मुंबईः अंदमानमध्ये बराच काळ रेंगाळलेल्या मान्सूनने वेग घेतला असून आता तो सक्रीय झाला आहे. मान्सून आज केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे. १० जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तासांत तुफान पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मान्सून नौऋत्यकडे वेगाने सरकत असल्यामुळे तो आजच केरळच्या किनारपट्टीवर धडकू शकतो. केरळच्या किनारपट्टीपासून अवघ्या ४०० किलोमीटर अंतरावर सध्या मान्सून आहे. सक्रीय झालेला मान्सून मालदीव समुद्रातून अरबी समुद्रात दाखल झाला आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
दक्षिण बंगालचा उपसागर आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागरातही मान्सून वेगाने पुढे सरकरत आहे. त्यामुळे मान्सूनचे लवकरच केरळात आगमन होणार आहे.
मान्सूनचे आज केरळमध्ये आगमन झाल्यास कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसतील. महाराष्ट्रात १० जूनला मान्सूनचे आगमन होईल. राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात जून, जुलैमध्ये कमी पाऊस तर ऑगस्टमध्ये साधारण पाऊस होईल, असा अंदाज आधीच हवामान खात्याने वर्तवला आहे.
या १२ जिल्ह्यांसाठी पुढील तीन-चार तास महत्वाचे
दरम्यान, महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन-चार तासांत तुफान पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे. आज धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या वेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. येत्या तीन-चार तासांत नाशिक आणि जळगावमध्ये गारपीट होण्यची शक्यता आहे. ठाणे आणि पालघरमध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मानम्यार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगण परिसरावरही चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीमुळे बिहारपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात पहायला मिळत असून त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.