
नागपूरः एकेकाळी साहित्यिक आणि समाजसेवक सामान्य जनतेचे आदर्श होते. त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक गर्दी करत असत. मात्र आज साहित्यिकांनी समाजातील हे स्थान गमावले आहे. केवळ पोकळ शब्दांचे डोंगर म्हणजे साहित्य नसून साहित्यिकांनी भविष्याचा वेध घेतला पाहिजे, अशी परखड टीका करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी मराठी साहित्यिकांना आरसा दाखवला. अशोक वाजपेयी यांनी ‘साहित्य म्हणजे अविरत सत्याग्रह’ असे म्हटले होते. पण त्यासाठी साहित्यिक हे सत्याग्रही असायला हवेत. आज किती साहित्यिक सत्याग्रही आहेत?, असा सवालही त्यांनी केला.
शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि विदर्भ साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (२२ नोव्हेंबर) नागपुरात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. बंग यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रिद्धपूरच्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी आणि कार्यवाह विलास मानेकर उपस्थित होते.
समाजात आणि जगात पुढे काय घडणार आहे, याची चाहूल प्रतिभावंत लेखकांना आधी लागते. ज्युल्स व्हर्न यांच्यासारख्या विज्ञानकथा लेखकांनी शंभर वर्षांपूर्वी भविष्यकालीन जगाचे चित्र उभे केले होते. त्यातील अनेक कल्पना पुढे प्रत्यक्षात उतरल्या. आजच्या लेखनातही साहित्यिकांची हीच दूरदृष्टी दिसायला हवी. मात्र आजचे साहित्य भूतकाळातील आठवणी किंवा स्वतःवर झालेल्या अन्यायाचे कथन करण्यातच रमलेले दिसते, असे डॉ. बंग म्हणाले.
मनोरंजन हीच समाजाची प्रमुख गजर बनत चालली असून समाजमाध्यमांवरील रिल्स हेच नव्या पिढीच्या जगण्याचे केंद्र बनले आहे. अशा परिस्थितीत लोकांना मनोरंजनातून मूल्यनिष्ठ साहित्याकडे वळवण्याची ताकद साहित्याने निर्माण केली पाहिजे. ती आजच्या साहित्यात आढळत नाही. साहित्यिकांनी केवळ भूतकाळातील गौरवगाथा किंवा वर्तमानातील दुःख मांडण्यापलीकडे जाऊन भविष्याचा वेध घ्यावा. समाजाला दिशा देणाऱ्या मूल्यनिष्ठ साहित्याची निर्मिती करावी, असेही डॉ. बंग म्हणाले.
लोकशाहीत ‘गण’ म्हणजे सामान्य जनतेला महत्व आहे. त्यामुळे साहित्य संमेलन हे केवळ ‘गणेशोत्सवा’सारखे उत्सवी स्वरुपाचे न राहता सामान्य जनतेचा सहभाग असलेला ‘गणोत्सव’ व्हावा. शब्दांच्या मागे जीवनाचे अनुभव असतील तरच साहित्य टिकते. केवळ पोकळ शब्दांचे डोंगर म्हणजे साहित्य नव्हे. सामान्य माणसांचे जीवन आणि त्यांचे प्रश्न साहित्यात केंद्रस्थानी असले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘जेन-झी’च्या आंदोलनांची चाहूल का लागली नाही ?
१९६३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’ कादंबरीमध्ये त्या काळातील तरुण मनाची कुंठितावस्था, अस्वस्थता आणि जीवनातील निरर्थकता भालचंद्र नेमाडेंनी मांडली आणि पुढच्या दहा वर्षातच भारतात सगळीकडे असंतुष्ट विद्यार्थ्यांची आंदोलने झाली. तरुणांच्या अस्वस्थ मनाची चाहूल नेमाडे यांना लेखक म्हणून आधीच लागली होती. आज ‘जंतर मंतर’ वर जेन-झींची आंदोलने सुरू आहेत. कोणत्या मराठी कादंबरीकाराला ही चाहूल लागली होती? आज प्रचंड अस्वस्थता आहे. शिक्षण भ्रष्ट झाले आहे. बेकारी वाढत आहे. विद्यापीठातील पदव्या निरुपयोगी आहेत. म्हणून पदवीनंतर पात्रता परीक्षा घेतात. त्यांच्यात पेपरफुटी होते. परीक्षेत भ्रष्टाचार होतो. मग विद्यार्थ्याचा स्फोट होतो. आता यापुढे काय घडणार आहे, ह्याचे प्रतिभ पातळीवरील भवितव्य चांगल्या लेखकाला मांडता आले पाहिजे, असेही डॉ. बंग म्हणाले.
