
अमरावतीः अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी प्रगतीपथावर असून महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक हे पहिल्या फेरीत १,५०० मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
पहिल्या फेरीत १४ हजार मतांची मोजणी करण्यात आली असून शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार किरण सरनाईक यांनी ३ हजार ८०० मते मिळाली आहेत. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना २ हजार २०० मते मिळाली आहेत. किरण सरनाईक हे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांच्यापेक्षा १ हजार ५०० मतांनी आघाडीवर आहेत.
पहिल्या फेरीच्या मतमोजणीच्या कलानुसार काँग्रेसच्या आदिती पोहरे, शिवसेना (ठाकरे गट) दत्तात्रय लहाने पिछाडीवर पडले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक व शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत देशपांडे यांच्यात चुरशीची चुरशीची लढत होत आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे, भाजपचे दुसरे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर भोयर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू, वजुक्टाचे डॉ. अविनाश बोर्डे, शिक्षक भारतीचे सुरेश देवकर यांच्यासह २६ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
