
छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत टपाली मतांची मोजणी सुरू असून मोजण्यात आलेल्या १०० मतांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यापेक्षा १३ मतांनी आघाडीवर आहेत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात एकूण ५१५ टपाली मते प्राप्त झाली. त्यापैकी २१ मते अवैध ठरली. वैध ठरलेल्या ४९४ मतांपैकी १०० मतांची मोजणी दुपारी ३. १० वाजता पूर्ण झाली. त्यात सतीश चव्हाण यांना ४५ तर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ३२ मते मिळाली. इतर उमेदवारांनी २३ मते मिळाली. म्हणजेच आ. सतीश चव्हाण हे १३ मतांनी आघाडीवर आहेत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरूवात झाली टपाली मतपत्रिकांची मोजणी हाती घेण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या एकूण ५१५ टपाली मतपत्रिकांपैकी २१ मतपत्रिका अवैध ठरल्या आहेत. ४९४ टपाली मते वैध ठरवण्यात आली आहेत. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पहिल्याच फेरीत मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा दावा केला आहे.
वैध ठरवण्यात आलेल्या ४९४ टपाली मतांपैकी पहिल्या ३० मतांच्या मोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) डॉ. प्रतापसिंह पाटील यांना १३ तर विद्यमान आ. सतीश चव्हाण यांना ११ मते मिळाली आहेत. म्हणजेच पहिल्या ३० मतांच्या मोजणीत आ. सतीश चव्हाणांना मागे टाकत डॉ. पाटील यांनी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पहिल्याच फेरीत मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा दावा केला आहे. पदवीधरांची ताकद गृहित धरू नका, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.
औरंगाबाद विभाग (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता चिकलठाणा एमआयडीसीतील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे प्रारंभ झाला. सकाळी ७.२५ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व निवडणूक निरीक्षक माधवी खोडे-चावरे आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँगरुम उघडण्यात आली. त्यानंतर मतमोजणी कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ देऊन मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात २३ ऑक्टोबर रोजी ८ जिल्ह्यातील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. या मतपेट्यांच्या मतमोजणीसाठी ७० टेबल लावण्यात आले असून १३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे.
