शरद पवारांच्या चक्रव्यूहात फसल्यामुळे आ. सतीश चव्हाणांची दमछाक, संस्थात्मक मतदानावरील हुकुमत गमावल्याने यंदाच्या निवडणुकीत विजयाचा चौकार कठीणच!


  • सुरेश पाटील/छत्रपती संभाजीनगर

 राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांचे मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थाचालकांशी असलेल्या घरोब्याच्या संबंधांवरच संस्थात्मक मतदानावर हुकुमत गाजवत मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सलग तीनवेळा विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या आ. सतीश चव्हाणांना यंदा संस्थात्मक मतदान पदरात पाडून घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी शरद पवारांनी ऐनवेळी टाकलेल्या चक्रव्यूहामुळे संस्थात्मक मतदानावरील हुकुमत गमावून बसलेल्या आ. चव्हाणांचा यंदाच्या निवडणुकीत ‘करेक्ट कार्यक्रम’ होण्याची शक्यता बळावल्यामुळे त्यांना विजयाचा चौकार मारणे अवघड दिसू लागले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या काही वर्षे आधीपासूनच आ. सतीश चव्हाण यांनी निवडणुकीची तयारी केली. मतदार नोंदणी करून घेण्यातही त्यांनी आघाडी घेतली. मराठवाडा पसरलेल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळा-महाविद्यालयांतील प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी करून घेतली. २००८, २०१४ आणि २०२० च्या निवडणुकीतही त्यांनी याच शैक्षणिक संस्थांच्या नेटवर्कचा नियोजनबद्धपणे वापर करून घेत तिन्ही निवडणुका जिंकल्या.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या यापूर्वी झालेल्या तीन निवडणुका आणि यंदा होऊ घातलेली निवडणूक यांच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी तफावत आहे. सतीश चव्हाणांनी मागील तीन निवडणुका जिंकल्या, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकीकृत होती. शरद पवार आणि अजित पवार यांचा सतीश चव्हाणांवर वरदहस्त होता. त्यामुळे त्यांना मागील तीन निवडणुकांना सामोरे जाणे फारसे अवघड गेले नाही. मात्र यावेळचे चित्र अगदीच वेगळे आहे.

हेही वाचाः आ. सतीश चव्हाणांच्या लेखी पदवीधरची आमदारकी लोकसेवेचे नव्हे, तर केवळ उत्पन्नाचे साधन?; शपथपत्रातून उघड झाली धक्कादायक माहिती!

ज्या शैक्षणिक संस्थांच्या शाळा-महाविद्यालयांच्या नेटवर्कचा वापर करत आ. सतीश चव्हाण यांनी मागील तीन निवडणुका जिंकल्या, त्या शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालयांच्या उभारणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शिक्षण संस्थाचालकांच्या गोटात शरद पवारांचा शब्द प्रमाण मानून काम करणारेच बहुतांश शिक्षण संस्थाचालक आहेत. यंदाच्या निवडणुकीत आ. सतीश चव्हाण हे अजित पवारांचे नेतृत्व गमावून बसलेल्या विभक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रतापसिंह पाटील हा आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे मागील तीन निवडणुकीत आ. सतीश चव्हाणांची एकगठ्ठा संस्थात्मक मतदानावर जी हुकुमत होती, ती आता राहिलेली नाही. हा यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासाठी मोठा सेटबॅक ठरण्याची शक्यता आहे.

मतदार नोंदणी चव्हाणांचीच, मतदान मात्र….

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीबरोबरच मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थांचे नेटवर्कही दुभंगले आहे. ज्या शैक्षणिक संस्था आणि शाळा-महाविद्यालयांतील मनुष्यबळाने मागील तीन निवडणुकीत आ. सतीश चव्हाणांना साथ दिली, ते मनुष्यबळ आता त्यांच्यासोबत राहिलेले नाही. परिणामी ज्या शैक्षणिक संस्था आणि शाळा-महाविद्यालयांत आ. सतीश चव्हाणांनी मतदार नोंदणी करून घेतली, ते मतदान यंदा त्यांच्या बाजूने होईलच, याची शाश्वती राहिलेली नाही. उदाहरणच घ्यायचे तर जालन्यातील राजेश टोपे यांची मत्सोदरी शिक्षण संस्था आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह पाटील विश्वस्त असलेल्या भैरवनाथ निसर्ग मंडळाच्या शाळा-महाविद्यालयात नोकरी असलेल्या पदवीधरांची आ. सतीश चव्हाणांनी नोंदणी करून घेतली खरी, पण राजकीय चित्र पालटल्यामुळे ते मतदान आता त्यांच्या बाजूने राहिलेले नाही. परिणामी नोंदणी आ. सतीश चव्हाणांची आणि मतदान मात्र अन्य उमेदवाराला झालेले पहायला मिळण्याचीच जास्त शक्यता आहे.

हेही वाचाः आ. सतीश चव्हाणांनी निवडून यावे ही भाजपची इच्छा की, गमावलेला ‘गड’ रिक्त करून घेण्याचा छुपा अजेंडा?; यंदा अंतर्गत व बाह्य आव्हानांशी ‘सच’ का सामना  अवघडच!

शरद पवारांनी केला ठरवून गेम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले आ. सतीश चव्हाण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले आणि त्यांच्या पक्षाकडून त्यांनी गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत पराभूत झाल्याबरोबर ते पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. चव्हाणांच्या या कोलांटउड्या शरद पवारांनी चांगल्याच लक्षात ठेवल्या आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रतापसिंह पाटलांसारखा तगडा उमेदवार ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आ. चव्हाणांचा ठरवून गेम केला. प्रतापसिंह पाटलांच्या उमेदवारीमुळे ज्या शैक्षणिक संस्थांतील मतदानावर मागील तीन निवडणुकीत आ. चव्हाणांची हुकुमत गाजवली, ती हुकुमत झटक्या सरशी त्यांच्या हातातून निसटून गेली. त्यामुळे एकेका मताची बेगमी करता करता त्यांच्या नाकी नऊ येऊ लागले असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

हेही वाचाः विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझांसह मंझा बंधूंच्या नोकऱ्या आणि ईश्वर मंझांची पेन्शनही धोक्यात, बोगस ‘जातवैधते’बाबत हायकोर्टाच्या निकालामुळे कारवाई अटळ

पवारांचा ‘चक्रव्यूह’ भेदणार कसा?

शरद पवारांनी शोधून उमेदवारी दिलेले प्रतापसिंह पाटील यांच्या पाठीशी शैक्षणिक संस्थांच्या नेटवर्कबरोबरच गेवराईचे बदाम, जालन्याचे खरात अशा मराठवाड्यातील राजकीयदृष्ट्या वजनदार असलेल्या घराण्यांचे नातेसंबंध आणि सातहून अधिक आजी-माजी आमदारांचे राजकीय पाठबळ आहे. यंदाच्या पदवीधर निवडणुकीत आ. सतीश चव्हाणांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याच्या दृष्टीने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवून राजकीय व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे पवारांनी टाकलेल्या चक्रव्यूहात फसलेल्या आ. सतीश चव्हाणांना ही निवडणूक प्रचंड कठीण होऊन बसलेली असल्यामुळे हा चक्रव्यूह भेदून ते विजयाचा चौकार मारतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!