
छत्रपती संभाजीनगरः राष्ट्वादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्या छत्रछायेखाली सलग तीन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आ. सतीश चव्हाण यंदा या दोन दिग्गज नेत्यांच्या छत्रछायेशिवाय भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आ. चव्हाण महायुतीचे उमेदवार असले तरी त्यांनी या निवडणुकीत निवडून यावे अशी खरेच भाजपची इच्छा आहे की आ. चव्हाणांमुळे गमवावा लागलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा गड रिकामा करून घेण्याचा छुपा अजेंडा भाजप नेतृत्वाकडून राबवला जात आहे? अशी शंका यावी अशारितीने भाजपने त्यांना निवडणुकीच्या प्रचारात एकटे पाडले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आ. चव्हाणांना अंतर्गत आव्हानासोबतच बाह्य आव्हानांचाही सामना करावा लागत असल्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या विजयाबद्दल साशंकता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच हा आपला पारंपरिक गड असल्याचा दावा भाजपकडून केला गेला आणि महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) हा मतदारसंघ सोडवून घेण्याचे जोरकस प्रयत्न करत निवडणुकीची तयारीही केली होती. माजी शिक्षण अधिकारी एम. के. देशमुख यांना विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी भाजपने त्यांना कामाला लावले होते आणि त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. परंतु ‘जेथे ज्याचा आमदार, तो त्याचा मतदारसंघ’ असे सूत्र ठरल्याचे सांगत भाजपने एम. के. देशमुखांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे आ. चव्हाणांना आपल्या मार्गातील अडसर दूर झाल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे.
आ. चव्हाणांनी ५ ऑक्टोबर रोजी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी नाही म्हणायला भाजपचे मंत्री, आमदार त्यांच्यासोबत होते खरे, परंतु प्रत्यक्षात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर भाजपसह महायुतीचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी आ. चव्हाणांच्या प्रचारापासून अलिप्त झाले आणि त्यांनी आ. चव्हाणांना एकटे पाडल्याचे दिसून येत आहे. आ. चव्हाण घेत असलेल्या जिल्हास्तरीय बैठका आणि पदवीधर संवाद मेळाव्यात भाजपचे मंत्री, आमदार, खासदार किंवा बडे नेते अभावानेच दिसू लागले आहेत.
भाजपच्या मनात कसले शल्य?
आ. सतीश चव्हाण हे २००८ मध्ये भाजपचे विद्यमान आमदार श्रीकांत जोशी यांचा पराभव करून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०२० च्या निवडणुकीतही त्यांनी भाजपच्याच उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता. ही सल भाजप नेतृत्व आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात कायम असतानाच २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवारांच्या गटातून शरद पवारांच्या गटात पक्षांतर करत गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शड्डू ठोकले होते. परिणामी ही निवडणूक आ. बंब यांना चांगलीच अवघड गेली होती. त्यामुळे कायम आपलाच पराभव करणारे आ. चव्हाण यांच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीच्या प्रचारात कसे उतरायचे? अशी खदखद मराठवाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे.
काय आहे नेमका छुपा अजेंडा?
भाजप नेतृत्व आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात कायम असलेली सल आणि १९८४ पासून २०२० पर्यंत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात झालेल्या आठ निवडणुकींच्या इतिहास पाहता भाजपने आ. सतीश चव्हाणांना महायुतीचे उमेदवार घोषित केलेले असले तरी हा आपला पारंपरिक मतदारसंघ रिकामा करून घेण्याचा छुपा अजेंडा भाजपकडून का राबवला जात आहे? याची कारणमीमांसा करण्यास पुरेसे ठरते.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या १९८४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव काळे निवडून आले. १९९० मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव करून भाजपचे जयसिंगराव गायकवाड निवडून आले. त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीतही भाजपचे जयसिंगराव गायकवाडच विजयी झाले. या निवडणुकीत तर २६ हजार मतांपैकी भाजपची नोंदणी केवळ साडेतीन हजार असतानाही काँग्रेसच्या वसंतराव काळेंसह सर्व ३३ उमेदवारांची अनामत जयसिंगरावांनी जप्त केली होती. हा रेकॉर्ड सलग तीनवेळा विजय मिळवणाऱ्या सतीश चव्हाणांनाही मोडता आला नाही. १९९८ मध्ये जयसिंगराव बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आणि १९९९ मध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत वसंतराव काळे जिंकले पण २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव करत भाजपचे श्रीकांत जोशी निवडून आले.
आपली या मतदारसंघावर मजबूत पकड बसल्याचे मानून भाजप निवांत असतानाच २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत सतीश चव्हाण हा नवखा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने मैदानात उतरवला. या निवडणुकीत भाजपचे विद्यमान श्रीकांत जोशींचा पराभव करून सतीश चव्हाण विजयी झाले. त्यानंतर २०१४ आणि २०२० मध्ये झालेल्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा पराभव केला. तब्बल १४ वर्षे हा मतदारसंघ ताब्यात राहिल्यामुळे यंदाची निवडणूक भाजपला आता हा मतदारसंघ रिकामा करून घेण्याची नामी संधी वाटू लागली आहे. त्यामुळे ‘महायुतीचा धर्म’ म्हणून भाजप आ. सतीश चव्हाणांच्या पाठिशी दिसत असली तरी पडद्यामागून मात्र यंदाच्या निवडणुकीत पराभव करून आ. सतीश चव्हाणांना धडा शिकवण्याची रणनिती भाजपकडून आखली जात असल्याचे राजकीय जाणकार सांगू लागले आहेत. त्यासाठी मित्रपक्षाच्याच मांडीला मांडी लावून त्यांचाच पद्धतशीरपणे काटा काढायचा, हा भाजपचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास राहिल्याचा दाखलाही ते देत आहेत.
‘सच’ सामने बडे चॅलेंज
एकीकडे महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपकडून राबवण्यात येत असलेल्या या छुप्या अजेंड्याचे अंतर्गत आव्हान आ. सतीश चव्हाणांपुढे असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रतापसिंह पाटलांच्या रुपाने त्यांच्या पुढे तगडे बाह्य आव्हान मैदानात उतरवले आहे. मोठे संस्थात्मक जाळे आणि राजकीय वारसा असलेले पाटील हे चव्हाणांपुढे मोठे आव्हान ठरले आहेत. त्यामुळे एकाबाजूला भाजपचा राजकीय इतिहास, आणि महायुतीच्या घटक पक्षांची प्रचारापासून अलिप्तता आणि दुसरीकडे प्रतापसिंह पाटलांचे दिवसेंदिवस तुल्यबळ होत चाललेले आव्हान पाहता आ. सतीश चव्हाण महायुतीतील अंतर्गत आव्हान आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तगडे बाह्य आव्हान पेलू शकतील का? याबाबत राजकीय विश्लेषक साशंक आहेत. त्यासाठी ते मित्र पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसून त्याचा पद्धतशीरपणे काटा काढण्याच्या भाजपच्या राजकीय इतिहासाचा दाखलाही ते देत आहेत.
‘दिग्गज’ छत्रछायेचा अभाव
आ. सतीश चव्हाणांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या २००८, २०१४ आणि २०२० अशा तीन निवडणुका जिंकल्या तेव्हा त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत अजित पवार यांची छत्रछाया होती. या दोघांचेही मराठवाड्यातील संस्थात्मक नेटवर्क उभारणीमध्ये मोठे योगदान आहे आणि या संस्थात्मक नेटवर्कमध्ये त्यांच्या शब्दाला वजनही राहिलेले आहे. तीच आ. सतीश चव्हाण यांच्यासाठी जमेची मोठी बाजू होती. या तिन्ही निवडणुकीत आ. चव्हाणांचा सामना थेट भाजपच्याच उमेदवाराशी झालेला आहे.
यंदाच्या निवडणुकीत आ. चव्हाणांवर या दोन्ही दिग्गज नेत्यांची छत्रछाया नाही आणि त्यांच्या आताच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या शब्दाला मराठवाड्याच्या संस्थात्मक नेटवर्कमध्ये फारसे वजन नाही. अशा स्थितीत आ. चव्हाण चोहोबाजूंनीच घेरले गेल्याचे चित्र मराठवाड्यात निर्माण झाल्याचे दिसू लागले असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासाठी विधान परिषद दूरच दिसू लागल्याची एकंदर परिस्थिती आहे. या परिस्थितीवर आ. चव्हाण कशी मात करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

