
नवी दिल्लीः मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलन आणि पोलिस कारवाईचे वृत्तांकन करताना कर्तव्यावर असलेल्या दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी लैंगिक छळ आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप तीन महिला पत्रकारांनी केला आहे. या प्रकरणी कारवाईसाठी दबाव वाढू लागल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.
शनिवारी (३ ऑक्टोबर) जंतर-मंतर आणि अशोका रोड परिसरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशातील प्रमुख विरोधी पक्ष आणि आयसा या विद्यार्थी संघटनेची निदर्शने सुरू होती. या निदर्शनाचे वृत्तांकन करण्यासाठी अनेक स्वतंत्र आणि डिजिटल नूजपोर्टलच्या महिला पत्रकार घटनास्थळी होत्या. घटनास्थळी वृत्तांकन करताना तेथे हजर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याशी अनुचित पद्धतीने शारिरीक संपर्क केला आणि आपला विनयभंग केला, असा आरोप तिन्ही महिला पत्रकारांनी केला आहे. या तिन्ही महिला पत्रकारांच्या आरोपांनंतर शनिवारी सायंकाळी अनेक स्वतंत्र पत्रकार आणि सोशल मीडिया कंटेट क्रिएटर संसद मार्ग पोलिस ठाण्याबाहेर पोहोचले आणि दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर एफआयर नोंदवण्याच्या मागणीसाठी त्यांनी निदर्शने केली.
या तिन्ही महिला पत्रकारांनी नवी दिल्ली जिल्हा पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. एका महिला पत्रकाराने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आंदोलक महिलांना ताब्यात घेतले जात असताना तेथे एकही महिला पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हती. पुरूष पोलिस अधिकारी महिलांना पकडत असल्याबद्दल तिने जाब विचारला असता एका पोलिस अधिकाऱ्याने तिच्याशी अयोग्य वर्तन केले आणि धक्काबुक्की केली. तिने विरोध दर्शवताच गर्दीचा फायदा घेत तो पोलिस अधिकारी पसार झाला.
दुसऱ्या एका महिला पत्रकाराने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ज्येष्ठ कार्यकर्ते योगेंद्र यादव आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना ताब्यात घेतले जात असताना तिने ती दृश्ये कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका पुरूष पोलिसाने तिच्याशी अश्लील आणि लज्जास्पद वर्तन केले. तिने जाब विचारल्यानंतर त्या पोलिसाने तिचे आरोप फेटाळून लावले.
महिला पत्रकारांनी केलेल्या लैंगिक छळ आणि विनयभंगाच्या आरोपामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दिल्ली पोलिसांनी रविवारी ट्विटरवर अधिकृत निवेदन जारी केले. ३ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली परिसरातील आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थाचे स्थितीदरम्यान तीन महिला पत्रकारांनी पोलिस अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. नवी दिल्ली जिल्हा पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करण्यासाठी या तक्रारी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत, असे दिल्ली पोलिसांनी या निवेदनात म्हटले आहे.
राहुल गांधींनी उपस्थित केले सवाल
महिला पत्रकारांच्या आरोपांवरून आता राजकारणही तापू लागले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिला पत्रकारांच्या आरोपांवरून दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृह मंत्रालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका महिला पत्रकाराने जंतर-मंतरवर एका पोलिस अधिकाऱ्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे आणि एफआयआर दाखल करा, या केवळ एकाच मागणीसाठी शेकडो पत्रकार अनेक तासांपासून बसले आहेत. एफआयआर दाखल करणे हे तर पोलिसांचे मुख्य कर्तव्य आहे. मग असे का केले गेले नाही?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली पोलिस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या प्रकरणी उत्तर का देत नाहीत? असा सवालही त्यांनी केला आहे.
