
नवी दिल्लीः नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील ढासळलेली शिक्षण व्यवस्था याला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी. मागणीसाठे गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. मोदी सरकार सीजेपीच्या आंदोलनापुढे झुकले आणि अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.
गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू होते. नीट फेपरफुटीप्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी कॉक्रोच जनता पार्टीने लावून धरली होती. या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. २० जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीने संसद भवनावर आयोजित केलेल्या मोर्चात लाखोंच्या संख्येने तरूण सहभागी झाले. या आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परंतु त्यानंतर या आंदोलनाला आणखीच धार चढली.
मोदी सरकारने मोर्चाच्या दिवशी चर्चेची कवाडे उघडली, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाशी मोदी सरकारची आज तिसऱ्या टप्प्यातील चर्चा हाणार होती. या चर्चेसाठी दुपारी साडेतीनच्या सुमाराची वेळ ठरली होती. ही बैठक होण्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा सोशल मीडियावर शेअर केला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर जल्लोष केला.
नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये देशाचे प्रधानमंत्री झाले. तेव्हापासून धर्मेंद्र प्रधान त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. गेल्या १२ वर्षांपासून मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रालयाचा पदभार आहे. त्यांनी विविध खाती सांभाळली आहेत. मोदी सत्तेत आल्यापासून त्यांच्या सरकारमध्ये टिकून राहण्याची किमया केवळ सातच नेत्यांना जमली आहे. त्यात नितीन गडकरी, राजनाथ सिंह निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, किरण रिरिजू, गिरीराज सिंह आणि धर्मेंद्र प्रधान या सात नेत्यांचा समावेश आहे. आरएसएसचा भक्कम पाठिंबा असूनही कॉक्रोच जनता पार्टीच्या दणक्यामुळे आता नॉटआऊट सातच्या यादीतून धर्मेंद्र प्रधान डिलिट झाले आहे.
राजीनामा देताना आठवले विद्यार्थ्यांचे भविष्य व करिअर!
कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवर ३६ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे राजीनामा देणे भाग पडलेले धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देताना मात्र देशातील विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि करिअर महत्वाचे असल्याची जाणीव झाली आहे. प्रधान यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पत्र लिहून प्रधानमंत्री मोदींकडे आपला राजीनामा सोपवला.
गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून मी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणांसाठी समर्पित राहिलो आहे. भारतातील युवा पिढीच्या स्वप्नांना साकार करणे हा आमच्या राजकीय व सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिला आहे, असे प्रधान यांनी या पत्रात म्हटले आहे.
जंतर-मंतर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये. देशातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी कोर्ट-कचेऱ्यांमध्ये वेळ न घालवता अभ्यासावर व स्वतःचे करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, याच विचाराने मी माझा राजीनामा प्रधानमंत्र्यांकडे सोपवत आहे.
आपण करून दाखवलः दिपके
आपण करून दाखवलं, असे म्हणत अभिजीत दिपके आणि आंदोलकांना तुफान जल्लोष केला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. हे कायम म्हणत होते की, या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत. पण आपण करून दाखवलं. घाबरायचे नाही. लोकशाही आहे. लोकशाहीत बोलायची भीती वाटत असेल तर मग ती कसली लोकशाही? आवाज उठवला तरच हे लोक लाईनमध्ये राहतील. यांना लाईनमध्ये ठेवणे आवश्यक आहे. वरती बादशहा समजून बसलेले लोक आमच्यामुळे तिथे बसले आहेत. राजीनामा तर झाला पण आम्ही सारे असे जाणार नाहीत. आमच्या आणखी दोन मागण्या आहेत. नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपये नुकसासन भरपाई द्यावी आणि २० जुलै रोजी आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई या दोन मागण्या आहेत, असे अभिजीत दिपके यांनी आंदोलकांशी बोलताना सांगितले.
