नात्यांचे तीन मुखवटे: जगण्याची आणि जपण्याची कला!


एकाच माणसाला हे तीन चेहरे सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. हे मुखवटे म्हणजे ढोंगीपणा नसून तो एक ‘अदृश्य अभिनय’ आहे, जो केवळ प्रेमापोटी केला जातो. नात्यातलं घर हे विटा-मातीपेक्षा शब्दांच्या संयमावर आणि शांततेवर उभं असतं. शेवटी, नाती शब्दांनी नाही, तर अनेकदा न बोललेल्या मौनानेच अधिक काळ टिकतात आणि बहरतात. या तीन अवस्थांतूनच नात्यांचं नाजूक विणकाम अखंड आणि अभेद्य राहते...

राहुल हरिभाऊ इंगळे-पाटील, रा.करकट्टा ता.जि.लातूर.

नात्यांची वीण टिकवण्यासाठी कधी डोळस अंधत्व, कधी सहनशील बहिरेपणा आणि कधी संयमी मौन स्वीकारावं लागतं. समोरच्याच्या उणिवांकडे दुर्लक्ष, कटू शब्दांना माफ करणं आणि योग्य वेळी शांत राहणं हीच नाती जपण्याची खरी कला आहे. प्रेमासाठी केलेला हा अदृश्य अभिनयच नात्यांना दीर्घायुष्य देतो.

नजरेवरती पडदा टाकू, उणिवांचा हा नजारा,
चूक तुझी ही भासे मजला, देखणा तुझा नखरा।
डोळस सोडून अंधार स्वीकारू, प्रेमाच्या या रीतीने,
संसाराची वीण सांधू, समजूतदार हसण्याने ॥१॥

तिखट बोलांची धार येता, कानांवरती आवरणे,
भाषण तुझे गाणे वाटे, लयीत तुजला सावरणे।
क्षमेचा हा कवच पांघरू, गर्वाची ही सोडून ढाल,
शांततेच्या वाऱ्याने मग, नात्याची ही राहे खुशाल॥२॥

शब्दांची ही शस्त्रे आवरू, ओठांवरती शांतता,
मौनदीप हा मनात लावू, संपवून ही कटुता।
कसरत ही अभिनयाची, प्रेमासाठी केलेली,
नात्यांची ही वेल सदा, शब्दावाचून बहरलेली॥३॥

मानवी आयुष्य म्हणजे नात्यांचा एक सुंदर पण नाजूक कोलाज. ही नाती कधी रेशमी धाग्यासारखी मऊ असतात, तर कधी काचेसारखी संवेदनशील. नात्यांचं हे विणकाम टिकवून ठेवणं ही एक मोठी जीवनकला आहे. ही जीवनकला साध्य करण्यासाठी आपल्या मुद्रेवर तीन मुखवटे परीधान करावे लागतील. हे मुखवटे म्हणजेच आंधळा, बहिरा आणि मुका होता आले पाहीजे. हा केवळ सुवीचार किंवा केवळ उपदेश नसून नातेसंबंधांच्या मंदिरातील ‘मौनदीप’ आहेत. नाती टिकवण्यासाठी एकाच व्यक्तीला अनेकदा हे तीन मुखवटे एकाच वेळी परिधान करावे लागतात. ही कला ज्याला जमली तो खरी नाती जपू आणि वाढवू शकतो.

अर्थात आपल्या नात्यात पहिला मुखवटा येतो तो म्हणजे ‘आंधळेपणा’. याचा अर्थ असा नाही की, धृतराष्ट्र सारख अंधत्व स्विकारायच तर डोळस अंधत्व असल पाहीजे. आपल्याला समोरच्याच्या चुका दिसत असतात, पण, कधी कधी डोळे असूनही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, म्हणजेच प्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधणं गरजेचं असतं. समोरच्याच्या उणिवांकडे काणाडोळा करून त्याच्यातील चांगुलपणा शोधणं, हा आंधळेपणा अगतिकतेचा नसून तो समजूतदारपणाचा असतो. सर्व काही पाहणारी नजर नाती वाचवू शकत नाही; कधी कधी मुद्दाम मिटलेले डोळेच घर आणि मनं टिकवतात.

दुसरा मुखवटा आहे ‘बहिरेपणा’. नात्यांच्या प्रवासात कधी कधी कटू शब्दांचे बाण सुटतात, टीकांचे वादळ येते. अशा वेळी अहंकाराला बाजूला सारून ‘क्षमेची शाल’ पांघरून बहिरे व्हावे लागते. टोचणारे शब्द जर मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवले, तर नात्याचा ओलावा आटायला वेळ लागत नाही. ऐकूनही न ऐकल्यासारखं करणं ही सहनशीलतेची सर्वोच्च पायरी आहे. यामुळे नात्यातील संवाद जरी थांबला, तरी विसंवाद टाळता येतो.

तिसरा आणि अत्यंत कठीण मुखवटा म्हणजे ‘मुके होणं’. जेव्हा अंतर्मनात शब्दांची धार तीव्र असते, उत्तर देण्याची पूर्ण क्षमता असते, तेव्हा ओठांवर ‘मौनाचा दीप’ लावणं हेच संयमाचं लक्षण आहे. मौन म्हणजे केवळ शांत बसणे नव्हे, तर नात्यांवर चढवलेलं ते एक सुगंधी चंदन आहे. शब्दांनी झालेली जखम भरून येत नाही, पण योग्य वेळी धरलेलं मौन नात्याचं तुटणारं घर पुन्हा सांधू शकतं.

एकाच माणसाला हे तीन चेहरे सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. हे मुखवटे म्हणजे ढोंगीपणा नसून तो एक ‘अदृश्य अभिनय’ आहे, जो केवळ प्रेमापोटी केला जातो. नात्यातलं घर हे विटा-मातीपेक्षा शब्दांच्या संयमावर आणि शांततेवर उभं असतं. शेवटी, नाती शब्दांनी नाही, तर अनेकदा न बोललेल्या मौनानेच अधिक काळ टिकतात आणि बहरतात. या तीन अवस्थांतूनच नात्यांचं नाजूक विणकाम अखंड आणि अभेद्य राहते. तर मग असे मुखवटे घालून तर पहा……

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!