
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रवीण वक्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांनी प्रकुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाल्यानंतर विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांनी या पदावर आपली वर्णी लावून घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. परंतु प्रा. डॉ. वक्ते यांची फिल्डिंग सरस ठरल्यामुळे आज त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी यापूर्वी ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकुलगुरूपदी वाणिज्य विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. वाल्मिक सरवदे यांची नियुक्ती केली होती. प्रा. डॉ. सरवदे यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी प्रकुलगुरूपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे गेल्या ४२ दिवसांपासून हे पद रिक्त होते. त्यामुळे पीएच.डी. विभागासह शैक्षणिक विभागातील अनेक कामे खोळंबली होती.
डॉ. सरवदे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या प्रकुलगुरूपदावर वर्णी लावून घेण्यासाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यात राज्यशास्त्र विभागातील एकमेवक पूर्णवेळ प्राध्यापक आणि प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, रसायन तंत्रज्ञान तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. भगवान साखळे, सरस्वती भुवन कला महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा. डॉ. मकरंद पैठणकर, आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली खापर्डे इत्यादींचा समावेश होता. या सगळ्यात प्रा. डॉ. वक्ते हे वरचढ ठरले आणि ‘वरून’ आलेल्या आदेशानुसार त्यांची प्रकुलगुरूपदी वर्णी लावण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक आज झाली. या बैठकीत कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १३ च्या पोटकलम (६) मधील तरतुदीनुसार प्रकुलगुरूपदी प्रा. डॉ. प्रवीण वक्ते यांची नियुक्ती करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेला केली. कुलगुरूंच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने प्रकुलगुरुपदी डॉ. वक्ते यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.
प्रा. डॉ. प्रवीण वक्ते यांनी डॉ. प्रमोद येवले हे कुलगुरू असताना काहीकाळ प्रकुलगुरू म्हणून काम पाहिले आहे. डॉ. वक्ते यांनी बेंगळुरूच्या राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान विभागातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली आहे. त्यांना २५ वर्षांहून अधिक अध्यापन आणि संशोधनाचा अनुभव असून विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर २०१७ ते २०२२ या काळात राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पैठणच्या संतपीठाचे संचालक आणि राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या राष्ट्रीय उच्चस्तर अभियान परिषदेचे (रूसा) सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतुदींनुसार प्रकुलगुरू हे कुलगुरूनंतरचे विद्यापीठाचे शैक्षणिक आणि कार्यकारी अधिकारी आहेत. ते अधिष्ठाता मंडळ, विद्यापीठ उपपरिसर मंडळ, विद्यापीठ विभाग आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास मंडळ, महाविद्यालयांमधील पदव्युत्तर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तसेच संशोधन व मान्यता समितीचे पदसिद्ध अध्यक्षही असतात. गेली ४२ दिवस विद्यापीठाचे प्रकुलगुरूपद रिक्त राहिल्यामुळे यापैकी अनेक कामे खोळंबली होती. प्रा. डॉ. वक्ते यांच्या नियुक्तीमुळे या खोळंबलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
