३ मे रोजी झालेली नीट २०२६ परीक्षा रद्द! पेपरफुटीमुळे फेरपरीक्षेचा निर्णय, सीबीआय चौकशीचेही आदेश!


नवी दिल्ली: पेपरफुटीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नीट-२०२६ (NEET-UG 2026) परीक्षाच रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा मोठा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतला आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटीची सीबीआयमार्फत चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. एनटीए ३ मे २०२६ रोजी ही परीक्षा घेतली होती. आता एनटीएकडून नीटच्या फेरपरीक्षेच्या स्वतंत्र तारखा जाहीर केल्या जाणारअसून विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेसाठी कोणचेही शुल्क भरावे लागणार नाही.
एनटीएने ३ मे २०२६ रोजी घेतलेल्या नीट-यूजी २०२६ परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांमुळे देशभरात एनटीएविरूद्ध संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे नीट परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी एनटीएने केंद्र सरकारच्या मंजुरीने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे एनटीएने म्हटले आहे.
८ मे रोजी या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आला होता. या केंद्रीय तपास यंत्रणांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि तांत्रिक तपासाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवला आहे, असे एनटीएने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शुल्क परत करणार: एनटीएच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना नीट-यूजीची फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे. फेकपरीक्षेमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी गैरसोय होणार आहे, याची एनटीएला जाणीव असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. ३ मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. नव्याने होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही किॆवा अतिरिक्त शुल्कही भरावे लागणार नाही, एनटीए स्वखर्चाने ही फेरपरीक्षा घेणार आहे.
परीक्षा केंद्रे तिच, प्रवेशपत्रे नवीन: ज्या विद्यार्थ्यांनी मे २०२६ च्या सत्रासाठी नोंदणी केली होती, त्यांची तीच नोंदणी व माहिती ग्राह्य धरली जाईल. फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रेही तिच राहातील. फेरपरीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील आणि विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची प्रवेशपत्रे जारी केली जातील, असेही एनटीएने म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत माहितीसाठी एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरच लक्ष ठेवावे, असे आवाहनही एनटीएने केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!