
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण? पानसरेंचे काय झाले माहिती आहे ना?… तुला घरात घुसून मारीन… चिरडून टाकीन… तुझी जीभ कापून टाकीन… अशा अर्वाच्च भाषेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. आ. गायकवाड यांनी दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल होत असून त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक १९८८ मध्ये प्रशांत आंबी यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या आजवर दीडलाखाहून अधिक प्रती वितरित झाल्या आहेत. या पुस्तकाचा अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादही झाला आहे. त्या पुस्तकाचा अचानक साक्षात्कार आमदार संजय गायकवाड यांना आता झाला आणि त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक/वितरक प्रशांत आंबी यांना फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर झपाट्याने व्हायरल होऊ लागली आहे.
महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात आदराचे स्थान असलेले पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या बहुचर्चित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना संजय गायकवाड यांनी फोन केला. ‘शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असलेले पुस्तक तुम्ही प्रकाशितच कसे करू शकता?’ असा सवाल करत आमदार गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण? त्याची काय अवस्था झाली तुला माहीत आहे ना?, तुला पण त्याला भेटायला वर जायचे आहे का? ब्राह्मण आहे का तू ब्राह्मण?’ अशी भाषा आमदार संजय गायकवाड यांनी वापरली. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आमदार संजय गायकवाडांना तुम्ही हे पुस्तक किमान एकदा वाचा, अशी विनंती करून पाहिली. मात्र ‘ अरे हरामखोरा, तू शिवाजी महाराज मला वाचायला सांगतो? रक्तात, रक्तात, कणाकणात शिवाजी महाराज आहेत…मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात….शिवाजी महाराज तुझ्या मायचा नवरा होता… तू हे पुस्तक छापायचे बंद कर नाहीतर मी तुला घरात घुसून मारीन… तुला चिरडून टाकीन… तुझी जीभ कापेन’, अशा भाषेत आमदार गायकवाड यांनी आंबी यांना धमकावले.
संजय गायकवाड यांनी सुमारे ९ मिनिटे प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या. विशेष म्हणजे आमदार संजय गायकवाड यांचे शिक्षण नववी पास असून ते पेशाने शेतकरी आहेत. बुलढाण्यातील ज्या शाळेत त्यांनी हे शिक्षण घेतले त्या शाळेचे नावही ‘श्री शिवाजी स्कूल’ असे एकेरीच आहे.
महाराष्ट्रभरातून तीव्र पडसाद
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी केलेली शिवीगाळ आणि दिलेल्या धमक्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघीतली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये. कारण ती लायकी यांची नाही. महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचे, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुसण्याचे काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होते आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देताना ‘पानसरे चे जे हाल केले, ते करण्याची’ म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचा देखील सहभाग आहे का, याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शिर्षकाबाबत गायकवाड यांना आता अचानक साक्षात्कार झाला. त्यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. गायकवाड यांच्याकडून आपण अपेक्षा तरी काय करू शकतो? वाचन आणि त्यांचा दूरदूरपर्यंत काही संबंध आहे, याची शक्यता कमीच आहे. पण समाजात वितुष्ट निर्माण करण्यात, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांनी पीएच.डी. घेतली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्या रोहिणी खडसे यांनी गायकवाडांचा समाचार घेतला आहे.
छत्रपती शिवरायांचे विचार जनमानसात रूजवण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. अशा महान विचारवंताचा धर्मांध शक्तींनी खून केला. त्यांच्या गुन्हेगारांना अजूनही शिक्षा झालेली नाही, असे असताना स्वतःला छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणवून घेणाऱ्या आमदाराने त्यांच्याच हत्येचा दाखल देत इतरांना धमक्या देणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी लज्जास्पद आहे. धमकी देणाऱ्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
बुलढाण्यात होणार जाहीर वाचन
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक आणि वितरक प्रशांत आंबी यांना धमकी आणि शिवीगाळ केल्यामुळे या पुस्तकाच्या जाहीर वाचनाचा कार्यक्रमच आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाण्यात घेण्याची घोषणा ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी केली आहे. संजय गायकवाड काय करतो हे बघूया, असे आव्हानच सरोदे यांनी दिले आहे. संजय गायकवाड आमदार आहे म्हणजे शिवीगाळ करण्याचे, कुणालाही मारहाण करण्याचे लायसन्स त्याला मिळालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आईप्रमाणे हृदयातील स्थान देऊन ‘शिवाजी’ म्हणणं म्हणजे महाराजांचा अपमान नाही. संजय गायकवाडसारखे अशिक्षित, अडाणी प्रवृत्तीचे लोक पूर्ण पुस्तक वाचत सुद्धा नाहीत व इतरांना शिवीगाळ सुरु करतात. आता अश्या मूर्खतेला कायद्याच्या मदतीने नेहमीसाठी लगाम लावावा लागेल, असे सरोदे यांनी म्हटले आहे.
