
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर फडणवीस सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीच संबंधित कार्यकर्त्यांचा भरणा केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून या समितीत डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे विचारवंत/अभ्यासकांऐवजी संघाशी ‘समरस’ असलेल्या कार्यकर्त्यांच्या खोगीर भरतीवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. या समितीचे सदस्य आणि प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक/विचारवंत प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
भीम जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १३ एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन केले आहे. या पुनर्गठनात छत्रपती संभाजीनगरचे प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे आणि नागपूरचे डॉ. प्रदीप आगलावे हे दोघे वगळता उर्वरित सर्वच्या सर्व सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि आरएसएसच्या छत्राखाली चालणाऱ्या संघटना व संस्थांचे पदाधिकारी किंवा सदस्य आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान, आंबेडकरी प्रमाणशास्त्र मानणाऱ्या खऱ्या अभ्यासकांची वर्णी न लावता राज्य सरकारने आरएसएसच्या विचारसरणीवर निष्ठा असलेल्या सदस्यांचाच भरणा केल्यामुळे समितीचे हे पुनर्गठन आंबेडकरी विचारांची धार बोथट करण्याचे आणि आरएसएसला अपेक्षित डॉ. आंबेडकरी विचारांची मांडणी करण्याचे षडयंत्र तर नाही ना? असा सवाल आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत आणि कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक/विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी पहिल्यांदा या समितीवर आक्षेप घेत ही समितीच बरखास्त करून टाकण्याची मागणी केली आहे. आता या समितीचे सदस्य प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी न्यूजटाऊनकडे आपली भूमिका मांडली आहे.
हेही वाचाः डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरएसएसः समता आणि बहुसंख्याकतेच्या हिंदुत्वातील वैचारिक संघर्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीत संघाशी समरस असलेल्या कार्यकर्त्यांसोबत काम कसे कराल? ते त्यांचाच अजेंडा राबवू लागले तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न न्यूजटाऊनने प्रा. डॉ. कांबळे यांना विचारला असता ‘ऋषीकेश कांबळेंच्या भूमिका सर्वांना ठाऊक आहेत. या समितीत प्रमाणशीर काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचसाठी मी या समितीचे सदस्यत्व स्वीकारले आहे. पण या समितीत काम करत असताना माझी घुसमट होत असेल तर मात्र राजीनामा देऊन बाहेर पडेन,’ असे प्रा. डॉ. कांबळे म्हणाले.
समितीत कोण कोण?
प्रा. डॉ. ईश्वर तुकाराम नंदपुरे (नागपूर), डॉ. रमेश माधवराव पांडव (छत्रपती संभाजीनगर), डॉ. भीमराव भोसले (कलबुर्गी, कर्नाटक), श्यामकांत हनुमंत अत्रे (डोंबिवली, ठाणे), प्रा. डॉ. विजय मोरे (खारघर, मुंबई), डॉ. सुनिल दादोजी भंडगे (पुणे), सागर कुसुम रूस्तूम शिंदे (छत्रपती संभाजीनगर), सीमा मिलिंद कांबळे (पुणे), प्रा.संजय सुधाकर साळवे (नाशिक), एकनाथ जावीर (पुणे), प्रा. डॉ. सुधाकर जनार्दन बोकेफोडे (पुणे), ऍड. क्षितिज गायकवाड (पिंपरी-चिंचवड), योगिता अशोक होके पाटील (छत्रपती संभाजीनगर), डॉ. रमेश रावळकर (छत्रपती संभाजीनगर) आणि प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे (छत्रपती संभाजीनगर) व डॉ. प्रदीप आगलावे (नागपूर)
