
मुंबईः महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन केले असून या पुनर्गठनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे विचारवंत, अभ्यासकांऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) निष्ठा असणाऱ्या व्यक्तींचीच खोगीर भरती करण्यात आली आहे. संघाशी ‘समरस’ असलेल्या कार्यकर्त्यांचाच भरणा झाल्यामुळे ही पुनर्गठित समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली असून ती बरखास्त करण्याची मागणी केली जात आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे १३ एप्रिल रोजी एका शासन निर्णयाद्वारे पुनर्गठन केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री उपाध्यक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव हे सदस्य सचिव, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक हे निमंत्रित सदस्य तर शासकीय मुद्रणालये व प्रकाशनेचे संचालक हे सदस्य असतील. या समितीवर राज्य सरकारकडून १६ सदस्य नामनिर्देशित करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे आणि नागपूरचे प्रसिद्ध विचारवंत/लेखक डॉ. प्रदीप आगलावे हे दोघे वगळता उर्वरित १६ सदस्य हे भाजप, आरएसएस, समरसता मंच, अभाविप, विवेक जागर मंच, समरसता साहित्य परिषदेशी संबंधित आहेत.
तीन वर्षांचा कार्यकाळ असलेल्या समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान, आंबेडकरी प्रमाणशास्त्र मानणाऱ्या खऱ्या अभ्यासकांची वर्णी लावता राज्य सरकारने आरएसएसच्या विचारसरणीवर निष्ठा असलेल्या सदस्यांचाच भरणा केल्यामुळे समितीचे हे पुनर्गठन आंबेडकरी विचारांची धार बोथट करण्याचे आणि आरएसएसला अपेक्षित डॉ. आंबेडकरी विचारांची मांडणी करण्याचे षडयंत्र तर नाही ना? असा सवाल आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत आणि कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
नागपूरचे प्रा. डॉ. ईश्वर तुकाराम नंदपुरे हे दलित लेखक, दलित नाट्य समीक्षक असले तरी २०१९ पासून आरएसएस प्रेरित संस्था समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. ‘सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक’ असे या साहित्य परिषदेचे बोधवाक्य आहे. डॉ. नंदपुरे यांची एकूणच जडण-घडण आरएसएसच्या मुशीत झालेली आहे. त्यांनी समरसता साहित्य परिषदेची भूमिका मांडणारे ‘समरसता साहित्यः संकल्पना-प्रेरणा-स्वरूप’ असे पुस्तकच प्रकाशित केलेले आहे.
छत्रपती संभाजीनगरचे डॉ. रमेश माधवराव पांडव आरएसएसशीच संबंधित असलेल्या महाराष्ट्र सामाजिक समरसता मंचचे निमंत्रक आणि आरएसएसचे प्रचारक आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेचे संचालक म्हणूनही काम केले आहे. विशेष म्हणजे डॉ. रमेश पांडव हे स्वतःला बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक असल्याचे सांगतात. नुकत्यात झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. पांडव यांच्या विशेष उपस्थितीत नाशिकमध्ये आरएसएसच्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य महाआरती’ कार्यक्रमाचा आयोजनावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असताना एकेकाळी आरएसएसच्या कट्टर विरोधात असल्याची बतावणी करत नंतर आरएसएसच्या मांडीवर अलगद जाऊन बसत आरएसएसचे सच्चे पाईक बनलेले डॉ. भीमराव भोसले हे सध्या कलबुर्गी येथील कर्नाटक केंद्रीय विद्यापीठात भाषाशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. आरएसएसच्या विचारधारेशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिल्याबद्दल त्यांची केंद्र सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडच्या अशासकीय स्वतंत्र संचालकपदी २०२१ मध्ये पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०२५ मध्ये त्यांची पुन्हा याच पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ठाण्यातील डोंबिवलीच्या श्यामकांत हनुमंत अत्रे हे आरएसएसच्या नेतृत्वातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीशी संबंधित असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते आणि वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी आहेत.
मुंबईतील खारघरचे प्रा. डॉ. विजय मोरे हे डोंबिवलीच्या स्वामी विवेकानंद कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालयात इतिहासाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. ते आरएसएसशी साहित्यिक आघाडी असलेल्या समरसता साहित्य परिषदेचे २०१९ पासूनच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
डॉ. सुनिल दादोजी भंडगे हे पुण्याच्या भांडारकर प्राच्चविद्या संशोधन संस्थेचे (बोरी) आजीवन सदस्य आहेत. तेही समाजिक समरसता मंचशी संबंधित आहेत. ते सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख आहेत. सागर कुसुम रूस्तूम शिंदे हे छत्रपती संभाजीनगर येथील आरएसएसचे कट्टर कार्यकर्ते आहेत. विवेक जागर मंच या आरएएस प्रेरित संघटनेत ते सक्रीयपणे काम करतात. पुण्याच्या सीमा मिलिंद कांबळे या डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या पत्नी आहेत. मिलिंद कांबळे हे विद्यार्थीदशेपासूनच आरएसएसशी जोडले गेले असून विद्यार्थी दशेत त्यांनी अभाविप या आरएसएसच्या विद्यार्थी आघाडीत काम केले आहे. त्यांनी भाजपकडून पुणे महानगरपालिकेची निवडणूकही लढवली होती.
नाशिकचे प्रा.संजय सुधाकर साळवे हेही आरएसएसचे स्वयंसेवक असून गेल्या वर्षी १० मे २०२५ रोजी मुंबई तरूण भारतमध्ये त्यांचा ‘राष्ट्रीय पुनरूत्थानः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ असा लेख प्रसिद्ध झालेला आहे. तो आजही त्यांच्या फेसबुक वॉलवर पहायला मिळतो. विद्यार्थीदशेत ते अभाविपचे सक्रीय कार्यकर्ते होते.
एकनाथ जावीर हे व्यवसायाने वकील असून ते अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे संस्थापक नेते आणि आरएसएसचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. होलार समाज संघटनेच्या कार्यक्रमाला सामाजिक समरसता मंच, आरएसएसचे स्वयंसेवक, डिक्कीच्या लोकांनाच निमंत्रित केले जाते.
या समितीच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेले पुण्याचे प्रा. डॉ. सुधाकर जनार्दन बोकेफोडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन समितीचे प्रमुख आहेत. पिंपरी-चिंचवड येथील औद्योगिक शिक्षण मंडळाचे ते संचालक आहेत. २०१८ मध्येही भाजप सरकारने त्यांच्यावर या समितीच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी सोपवली होती. तेही संघाशी संबंधित असल्याचा आरोप तेव्हाही झाला होता.
ऍड. क्षितिज गायकवाड हे पिंपरी-चिंचवड येथील भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी ते काँग्रेसचे पिपंरी-चिंचवड शहरजिल्हा उपाध्यक्ष होते. योगिता अशोक होके पाटील या छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत. विद्यापीठ विकास मंच या आरएसएस नेतृत्वातील संघटनेच्या पॅनलच्या त्या उमेदवार होत्या. या पॅनलच्या त्या माध्यमातून त्या विद्यापीठाची अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेवर निवडून आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरचे डॉ. रमेश रावळकर हे अजिंठा येथील बाबुराव काळे महाविद्यालय या कायम विनाअनुदानित महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. नजीकच्या काळात त्यांचा आरएसएस, समरसता मंचशी घरोबा वाढल्याचे त्यांचा मित्र परिवारच सांगतो.
दरम्यान, राज्य सरकारने केलेल्या या समितीच्या पुनर्गठनावर राज्यातील आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक, लेखक व कार्यकर्त्यांकडून तीव्र आक्षेप घेण्यात येऊ लागले आहेत. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्यासह अनेकांनी ही समिती तातडीने बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
विशिष्ट ‘अजेंडा’ राबवण्याचा डाव: डॉ.मनोहर
नव्या समितीत ‘समरसतेच्याच कार्यकर्त्यां’चा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे ही समिती त्वरित बरखास्त करून आंबेडकरी प्रमाणशास्त्र मानणाऱ्या खऱ्या अभ्यासकांची नवी समिती स्थापन करावी, अशी मागणी प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केली आहे.
ज्या समितीवर बाबासाहेबांचे चरित्र आणि साधने प्रकाशित करण्याची जबाबदारी आहे, त्या समितीचे सदस्य हे केवळ सरकारी निष्ठा असणारे नव्हे तर बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे असावेत. सध्याच्या समितीच्या रचनेत शासनाचा विशिष्ट अजेंडा राबवला जात असल्याची शंका येत आहे. समरसतावाद्यांचा भरणा समिती बरखास्त करून नवी समिती स्थापन करावी, हीच माझी स्पष्ट सूचना आहे. महाराष्ट्र शासन हे संविधानिष्ठ असून त्यांनी स्थापन केलेली समिती खरोखरच आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशित करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे जाणत्या लोकांना वाटले पाहिजे, असेही डॉ. मनोहर यांनी म्हटले आहे.
‘वैचारिक कंट्रोल’ आणण्याचे षडयंत्रः पातोडे
‘हा केवळ समिती बदल नसून फुले शाहू आंबेडकरी विचारांची धार बोथट करण्याचा प्रयत्न आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून त्यांच्याच साहित्याला भाजप संघ पूरक दाखवण्याचे हे कारस्थान वेळीच ओळखणे गरजेचे आहे. ही केवळ समितीची पुनर्रचना नाही, तर येणाऱ्या काळातील वैचारिक लढाईची नांदी आहे. जर आंबेडकरी समूह आणि अभ्यासक आता गप्प राहिले, तर उद्याचा इतिहास हा ‘सरकारला हवा तसा’ लिहिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे ही बोगस समिती तातडीने बरखास्त करून नव्याने समिती गठित करण्यात यावी. त्यात फक्त ज्यांचा चळवळीशी थेट संबंध आणि योगदान आहे अशाच चळवळीतील अभ्यासक, विद्वान, बुद्धिजीवी आणि आंदोलकांचा समावेश करावा. खोगीर भरती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, वैचारिक ‘कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.
ज्यांनी सत्तेला सडेतोड प्रश्न विचारले असते, असे ‘आक्रमक’ आवाज या समितीतून पद्धतशीरपणे गायब करण्यात आले आहेत आणि ‘लो-प्रोफाईल’ सदस्यांचा भरणा नव्हे तर खोगीर भरती करण्यात आली आहे. ही एक संघी रणनीती आहे. नवीन समितीतील अनेक सदस्यांचा सार्वजनिक वावर अत्यंत मर्यादित आहे. हे सदस्य तांत्रिकदृष्ट्या पात्र वाटत असले, तरी त्यांची वैचारिक भूमिका धूसर आहे. ते आरएसएस-भाजपला पुरक आहेत. जेव्हा समितीवर असे लोक असतात ज्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख नसते, तेव्हा सरकारला अशा समितीवर पडद्यामागून नियंत्रण मिळवणे सोपे जाते. यालाच राजकीय परिभाषेत ‘कंट्रोल विदाआउट व्हिसिबिलिटी’असे म्हटले जाते, असेही पातोडे यांनी म्हटले आहे.
न्यूजटाऊनचे आवाहन
महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारवंत/साहित्यिक आणि आंबेडकरी प्रमाणशास्त्रावर विश्वास असलेल्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आणि खुलेपणाने मंथन केले पाहिजे, ही न्यूजटाऊनची भूमिका आहे. आपल्या भूमिका m.newstown@gmail.com वर पाठवा. योग्य भूमिकांना उचित प्रसिद्धी दिली जाईल.

