
मुंबई: मुंबई शहर जिल्ह्यातील मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला आता डिजिटल गती मिळाली असून याबाबत विधानसभेत निवेदन करताना सांगितले. मुंबईत प्रथमच मिळकतीचे फेरफार ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत. मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
मुंबई शहर व उर्वरित महाराष्ट्रातील प्रॉपर्टी कार्ड संगणकीकरणाच्या प्रणाली वेगवेगळ्या असल्यामुळे आतापर्यंत मुंबईत ऑनलाईन फेरफार प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने या प्रक्रियेला गती दिली आहे, असे बावनकुळे म्हणाले.
मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभाग व ४ नगर रचना योजनांमधील सुमारे २७,८४७ मिळकती पत्रिका mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यासाठी विशेष ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून पोर्टलद्वारे नागरिकांना घरबसल्या फेरफारसाठी अर्ज करता येणार आहेत. अर्जाची स्थितीही ऑनलाईन तपासता येणार असल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मुंबई शहर जिल्ह्यात प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये खरेदीखत, वारसा, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन अशा विविध प्रकारांचा समावेश आहे,बावनकुळे म्हणाले.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना होणार असल्याचे सांगून मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे हा उपक्रम राबवल्याबद्दल बावनकुळे यांनी अभिनंदन केले.
