
मुंबई: राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत समाविष्ट रूग्णालये जर मोफत उपचार देत नसतील तर त्या रूग्णालयांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत आ. अभिजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार देणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. या योजनेबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल, आबिटकर म्हणाले.
मोफत आरोग्य सेवांचा लाभ गरजू नागरिकांना पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने देण्यासाठी शासन प्रभावीपणे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. अतुल भातखळकर, संजय केळकर, योगेश सागर यांनी उपप्रश्न उपस्थित करुन चर्चेत सहभाग घेतला.
