
मुंबईः गेल्या अनेक महिन्यांपासून सबंध महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज संस्थांच्या पहिल्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाने, उपसचिव सूर्यकृष्ण मूर्ती, उपायुक्त राजेंद्र पाटील उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी राज्यभरात २ डिसेंबर रोजी मतदान होईल तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल, या निवडणुकांचे निकाल १० डिसेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जातील.
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर करत आहोत. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरूवात १० नोव्हेंबर २०२५ पासून होईल. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत असेल. १८ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाणनी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर २०२५ असेल. अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी मागे घेण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर असेल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवातः १० नोव्हेंबर २०२५
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदतः १७ नोव्हेंबर २०२५
- उमेदवारी अर्जांची छानणीः १८ नोव्हेंबर २०२५
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदतः २१ नोव्हेंबर २०२५
- आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदतः २५ नोव्हेंबर २०२५
- निवडणूक चिन्हांचे वाटप व अंतिम उमेदवार यादीः २६ नोव्हेंबर २०२५
- मतदानाची तारीखः २ डिसेंबर २०२५
- मतमोजणीची तारीखः ३ डिसेंबर २०२५
- शासन राजपत्रात निवडणूक प्रसिद्धीः १० डिसेंबर २०२५
अध्यक्षांची थेट जनतेतून निवड
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. राज्यातील निवडणुकीसाठी पात्र असलेल्या २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या या निवडणुकीतून ६ हजार ८४९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. निवडणूक जाहीर झालेल्या २४६ नगर परिषदांमध्ये १० नवीन नगर परिषदांचा समावेश आहे. उर्वरित २३६ नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.
राज्यात एकूण १४२ नगर पंचायती आहेत. त्यापैकी ४२ नगर पंचायतींची निवडणूक होत आहे. त्यामध्ये १५ नव्या नगर पंचायतींचा समावेश आहे. तर २७ नगर पंचायतींची मुदत संपलेली आहे. १०५ नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षपदासाठी थेट जनतेतून निवड केली जाणार आहे.
निवडणूक खर्च मर्यादाही वाढवली
या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. अ वर्ग नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख तर सदस्यपदासाठी ५ लाख रुपयांची निवडणूक खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. ब वर्ग नगर परिषदांच्या अध्यक्षपदासाठी ही मर्यादा ११ लाख २५ रुपये तर सदस्यपदासाठी ३ लाख ५० हजार रुपये तर क वर्ग नगर परिषदांच्या अध्यक्षपदासाठी ७ लाख ५० रुपये तर सदस्यपदासाठी २ लाख ५० हजार रुपये निवडणूक खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे.राज्यातील नगर पंचायतींच्या अध्यक्षपदासाठी ६ लाख रुपये तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे.
ऑनलाइन भरावे लागणार उमेदवारी अर्ज
उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या संकेतस्थळावर स्वीकारली जातील. एका प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देश पत्रे दाखल करता येतील. राखीव जागांसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांनी जातवैधता प्रमाणपत्रांसाठी अर्ज केला आहे, त्यांना अर्ज केल्याची पावती जमा करावी लागेल. पण असा उमेदवार निवडून आल तर ज्याला निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या मतदान केंद्रनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
ऍपवर मिळणार इत्यंभूत माहिती
राज्य निवडणूक आयोगाने मतदारांसाठी संकेतस्थळ आणि मोबाईल ऍप विकसित केले आहे. संकेतस्थळावरील सर्च सुविधेअंतर्गत मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल. मतदारांसाठी विकसित केलेल्या मोबाईल ऍपमध्ये मतदारांना मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, उमेदवारांविषयी माहिती, उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची माहिती, शिक्षण व आर्थिक स्थितीविषयी माहिती मतदारांना मिळेल, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.
