नाशिक कुंभमेळ्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी ९ हजार ६३३ कोटी रुपयांचा विकास आराखडा; वाचा कुठे आणि कोणत्या सुविधांचा होणार विकास?


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, वेरुळ, पैठण व आपेगाव येथे तब्बल ९६३३ कोटी ५१ कोटी रुपयांच्या विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला असून या विकास आराखड्यात प्रामुख्याने परिवहन व वाहतूक व्यवस्था, मुलभूत सुविधा, भाविक पर्यटकांची सोय व राहण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, ऐतिहासिक स्थळांचे जतन या महत्त्वाच्या बाबी विचाराधीन करुन सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर, वेरुळ, पैठण व आपेगाव कुंभमेळा-२०२७ विकास आराखड्यासंदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. सन २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यानिमित्त लाखो भाविक, पर्यटक, साधुसंत हे महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देतील. त्यात जिल्ह्यातील वेरुळ आणि पैठण हे स्थळ महत्त्वाचे आहे. अंदाजे एक कोटी भाविक कुंभमेळा कालावधीत येतील असा अंदाज घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

असा आहे आराखडा

वेरुळ व छत्रपती संभाजीनगर येथील विकासकामांचा आराखडा ७१२६ कोटी २९ लाख रुपयांचा असून पैठण व आपेगाव येथील आराखडा २५०७ कोटी २२ लक्ष असा एकूण ९६३३ कोटी ५१ लक्ष रुपयांचा आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

वाहतक व्यवस्थाः वाहनतळांसाठी १३० हेक्टर क्षेत्रावर पार्किंग आणि निवास व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात  धुळे-सोलापूर महामार्ग (समृद्धी महामार्ग लगत), धुळे-सोलापूर महामार्ग (कन्नड लगत), खुलताबाद रस्ता (फुलंब्रीकडील बाजू), छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग-५२ लगत अशा ठिकाणी ही पार्किंग स्थळे व निवास व्यवस्था निर्माण करण्यात येईल.

रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, वन वे मार्ग, फेरी बसेस, धार्मिक स्थळांच्या जवळ ई- रिक्षा सेवा, बस स्थानकांवर रियल टाईम डिस्प्ले, आणीबाणीच्या कालावधीतील वाहनांसाठी (अग्निशमन वहने, रुग्णवाहिका, सुरक्षा दलाची वाहने इ.) राखीव मार्ग, डिजिटल वाहतूक व्यवस्थापनासाठी जीपीएस अनुकूल पथदिवे, वाहतूक सिग्नल्स, दिशादर्शक व सूना फलक, ई-व्हेईकल पार्किंग व चार्जिंग स्टेशन्स इत्यादींचा समावेश आहेत.

भाविकांसाठी मुलभूत सुविधाः स्वच्छता गृहे, स्त्री, पुरुष व दिव्यांगांसाठी स्वच्छता गृहांची निर्मिती व अस्तित्वात असलेल्या सुविधांची दुरुस्ती, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, आर.ओ. प्लांट, टॅंकर व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा, माहिती केंद्र स्थापणे जेथून भाविक-पर्यटकांना माहिती व मार्गदर्शन मिळू शकेल. याशिवाय तीन लाख लोक राहू शकतील अशा क्षमतेची तंबू शिबिरे, धर्मशाळा दुरुस्ती करणे, अशा स्थळांजवळ व तीर्थक्षेत्रांजवळ अन्नक्षेत्र उभारणे हॉटेल व लॉजसाठी सल्लागार सेवा व त्यासाठी क्यूआर कोड बुकिंग सेवा या सुविधांची निर्मिती करण्यात येईल.

सुरक्षा व्यवस्थाः २४ तास निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे देखरेख, तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारणे व नियंत्रण कक्ष स्थापित करणे, आपत्ती प्रतिसाद दल स्थापित करणे व अग्निशमन केंद्र, आरोग्य सेवा पथके सज्ज ठेवणे, महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन, महिला पोलिसांची पथके तैनात करणे, गर्दीच्या व्यवस्थापनासाठी बॅरिकेटींग, सेप्रेशन वॉल्स, सुरक्षा मार्ग इत्यादी व्यवस्था करणे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करणे. त्यात हेलिपॅड उभारणी, विश्रामगृह इत्यादींचा समावेश आहे.

पर्यटन नियोजनवेरुळ लेणी व मंदिर सजावट व प्रकाश योजना, दर्शनाचे वेळापत्रक नियोजन करणे,  अधिकृत मार्गदर्शन व बहुभाषिक माहिती, स्थानिक तीर्थक्षेत्र व्यवस्थापन, दर्शन वेळापत्रक रियल टाईम उपलब्ध करणे, मोफत वायफाय सुविधा, पर्यटकांसाठी माहितीचे ॲप व पोर्टल्स तयार करणे, क्यूआर कोड व व्हर्च्युअल गाईड सुविधा इत्यादींची निर्मिती प्रस्तावित आहे.

स्थानिक विक्रेत्यांना अधिकृत स्टॉल्स उपलब्ध करणे, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, स्थानिकांना रोजगार संधी निर्माण करणे इत्यादी बाबींचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.

सुविधांचा विकास आणि पर्यटनातील लौकीक वाढवाः शिरसाट

कुंभमेळा २०२७ च्या निमित्त जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर , वेरुळ, पैठण व आपेगाव या क्षेत्रांचा विकास आराखडा तयार करतांना आपल्या जिल्ह्यात शाश्वत सुविधांचा विकास व्हावा व पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याचे देशभरात नाव होऊन लौकीक वाढवावा, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या बैठकीत दिले.

कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यात समाविष्ट कामांमुळे आपल्या जिल्ह्याचा शाश्वत विकास साधला जावा, यादृष्टीने कामांचे नियोजन करा. यानिमित्त येणाऱ्या पर्यटकांपर्यंत आपला जिल्हा पोहोचवण्याची ही संधी आहे. पर्यटनाच्या क्षेत्रात आपला जिल्हा पुढे कसा नेता येईल हे पहावे. पर्यटकांसाठी सुविधा देतांना त्यांना सुरक्षित वातावरण देण्यास प्राधान्य द्यावे. येणारे भाविक, पर्यटक हे शहरात येऊनच जातील. त्यामुळे इतक्या पर्यटकांचा सामावून घेण्याइतपत सुविधा आपल्याकडे असावयास हव्या, यादृष्टीने नियोजन करा व तातडीने अंतिम प्रस्ताव तयार करा,असे निर्देश मंत्री शिरसाट यांनी दिले.

लोकप्रतिनिधींच्या सूचना

  • आ. प्रशांत बंब यांनी तयार केलेला आराखडा हा सुविधांच्या विकासासाठी असून त्याचा उपयोग आपल्या जिल्ह्यातील पर्यटन वाढावे यासाठी व्हावा. तसेच हा आराखडा सर्वसमावेशक असावा,अशी सूचना त्यांनी केली. तसेच आराखडा अंतिम करतांना ज्या ज्या जिल्ह्यात कुंभमेळा विकासाची कामे होत आहेत तेथील आराखड्यांचाही अभ्यास करावा, अशीही सूचना त्यांनी केली.
  • नाशिक येथे होत असलेल्या कुंभमेळ्यानिमित्त येणारे भाविक हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या वैजापूर तालुक्यातून येतील. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील तसेच नाशिक कडून येणाऱ्या रस्त्यांची विकासकामे यात समाविष्ट करावीत, अशी सूचना आ. रमेश बोरनारे यांनी केली.
  • या आराखड्यात पार्किंग स्थळे मुख्य देवस्थानापासून लांब (किमान ४ किमी) अंतरावर असली तरी तेथून भाविकांची ने-आण करण्यासाठी अंतर्गत सार्वजनिक बस वाहतूक सुविधा असावी, अशी सूचना आ. विक्रम काळे यांनी केली.
  • सुविधा विकासांमध्ये स्थानिक उत्पादनांच्या विक्री, स्थानिकांना रोजगार याबाबींचा समावेश असावा तसेच वैजापूर परिसराचाही यात समावेश करावा, अशी सूचना खा. डॉ. कल्याण काळे यांनी केली.
  • वेरुळ परिसराप्रमाणेच भद्रा मारोती परिसरातही भाविक येतील, त्यामुळे भद्रा मारोती या क्षेत्राचाही या आराखड्यात समावेश करावा. मनपा क्षेत्रात नियोजन केलेल्या कामांचा तपशील सादर करावा,अशी सूचना खा. भागवत कराड यांनी केली.
  • सादर केलेल्या आराखड्यात दिलेल्या बाबींचा तपशील देण्यात यावा. पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्या. पर्यटनावर भर देतांना रस्ते विकास व वीज वितरण, ट्रान्फार्मर व विद्युत खांबांचे स्थानांतरण अशा बाबींचाही समावेश या आराखड्यात करण्यात यावा, अशी सूचना मंत्री अतुल सावे यांनी केली.

या बैठकीला इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे,  राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, विधानसभा सदस्य आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले तर नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी सूत्रसंचालन केले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!