समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे अखेर निलंबित, अनियमितता आणि महिला कर्मचाऱ्यांना घरगड्यासारखे राबवून घेणे भोवले!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): निविदा प्रक्रियेचे उल्लंघन करून मर्जीतील ठेकेदारांना वसतिगृहाचा भोजन ठेका देऊन केलेली अनियमितता, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर केलेले जातीयवादाचे गंभीर आरोप आणि वसतिगृहात नियुक्त करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून घरगड्यासारखे राबवून घेत त्यांचे केलेले शोषण यासह अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त आणि जिल्हा जातपडताळणी समितीच्या विद्यमान उपायुक्त जयश्री रावण सोनकवडे यांना आज (२३ सप्टेंबर) अखेर निलंबित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव सो.ना. बागल यांच्या स्वाक्षरीने हे निलंबन आदेश जारी करण्यात आले.

समाज कल्याणच्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तपदी असताना जयश्री रावण सोनकवडे यांनी शासनाचे प्रचलित नियम, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांचा भंग करून अनेक अनियमितता केल्या. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा जातपडताळणी समितीच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर त्यांनी आपण केवळ चर्मकार समाजातील महिला अधिकारी असल्यामुळे विशिष्ट जातीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी जातीय भावनेतून आपल्यावर अन्याय करत बदली केल्याचा आरोप समाज माध्यमांवर केला होता. त्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अकडल्या होत्या.

हेही वाचाः Video: समाज कल्याण उपायुक्त सोनकवडेंनी कामगार महिलेला घरगड्यासारखे राबवून करवून घेतला मसाज, पायही चेपून घेतले; आता तोंड बंद करण्याचा प्रयत्न!

जयश्री सोनकवडे यांनी तांत्रिक अडचणी दाखवून मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे प्रस्ताव अडवून ठेवले होते. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी भोजन पुरवठा करण्यासाठी मर्जीतील ठेकेदाराची नियुक्ती करून मनमानी केली. शासकीय वसतिगृहात बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना आपल्या घरातील खासगी कामे करवून घेऊन त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. अधिकारी आणि कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ प्रलंबित ठेवले आणि ते विलंबाने अदा केले, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे.

हेही वाचाः समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांचा प्रताप: ई-टेंडरिंग न करताच सलग तीन वर्षे मर्जीतील ठेकेदारांच्या घश्यात घातले वसतिगृहात भोजन पुरवठ्याचे कंत्राट!

जयश्री सोनकवडे यांनी शासकीय वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्यांना आपल्या घरी बोलावून त्यांच्याकडून स्वतःची व आईची मालिश करणे, फरशा पुसून घेणे, हातपाय दाबायला लावणे, साफसफाई करवून घेण्याबरोबरच त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचे शोषण केले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४६, ३५१(२), ३ (५) अन्वये ८ ऑगस्ट रोजी गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या गैरवर्तणुकीमुळे जयश्री सोनकवडे यांनी कर्तव्याचे पालन करण्यात कसूर करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमातील नियम ३ चा भंग केला आहे, असेही या निलंबन आदेशात म्हटले आहे.

हेही वाचाः समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडेंविरुद्ध अखेर छळाचा गुन्हा दाखल; छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी महिनाभरानंतर दिला पीडित महिलांना ‘न्याय’

जयश्री सोनकवडे यांनी केलेल्या अनियमितता, महिला कर्मचाऱ्यांचे शोषण इत्यादी बाबी लक्षात घेता महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमातील नियम ४ च्या पोटनियम (१) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आल्याचे या निलंबन आदेशात म्हटले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक उपायुक्त कार्यालय राहील. त्यांना याकाळात पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही आणि या काळात त्यांना कोणतीही खासगी नोकरीही करता येणार नाही, असेही या निलंबन आदेशात म्हटले आहे.

हेही वाचाः रूजू अहवालात जयश्री सोनकवडेंकडून ‘सामाजिक न्याय’च्या प्रधान सचिवांसह समाज कल्याण आयुक्तांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, परंतु अद्याप कारवाई नाही!

निलंबनानंतर थेट मंत्र्यावरच आरोप

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निलंबन आदेश प्राप्त झाल्यानंतरही जयश्री सोनकवडे यांच्या वर्तनात फरक पडला नसल्याचेही दिसून आले आहे. निलंबनानंतर सोनकवडे यांनी कार्यालयीन व्हॉट्सग्रुपवर एक मेसेज पोस्ट केला आहे. त्या मेसेजमध्ये त्यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे थेट नाव घेऊनच निलंबनाबाबत त्यांच्यासह सामाजिक न्याय विभागाच्या अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे.

हेही वाचाः समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडेंनी गंभीर गैरवर्तन आणि नागरी सेवा नियमांचाही भंग झाल्याचे स्पष्ट, आता विभागीय चौकशीचे आदेश

‘आज मला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळकर, प्रशांत चव्हाण, हरेश्वर डोंगरे तसेच चौकशी समितीतील दोन अधिकारी सुरेंद्र पवार आमि प्रमोद जाधव, वंदना कोचुरे या सर्वांच्या कामामुळे मला निलंबित करण्यात आले आहे’, असे थेट नाव घेऊनच सोनकवडे यांनी आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!