
पुणेः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महाटेट परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. इयत्ता १ ली ते ८ वीच्या वर्गाला अध्यापन करण्यासाठी होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा अनिवार्य आहे. १५ सप्टेंबरपासून या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापने, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमांच्या अनुदानित/विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षकपदावर नियुक्तीसाठी टेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे सध्या १ ली ते ८ वी वर्गाच्या अध्यापनासाठी सेवेत असलेल्या शिक्षकांनाही टेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटले आहे. त्यामुळे या परीक्षेला आणखी महत्व प्राप्त झाले आहे.
टेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, प्रवेशपत्र डाऊनलोड करणे, परीक्षेचे शुल्क भरणे व या परीक्षेशी संबंधित अद्ययावत माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने https://mahatet.in हे अधिकृत संकेतस्थळ विकसित केले आहे. महाटेट-२०२५ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आणि परीक्षेचे शुल्क अदा करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होईल. ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरून परीक्षा शुल्क अदा करता येईल.
३ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांना १० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या काळात त्यांची प्रवेशपत्रे ऑनलाइन प्रिंट काढून घेण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.
परीक्षेचे वेळापत्रक असे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टेट परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार शिक्षक पात्रता पेपर-१ हा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळा १०.३० ते दुपारी १.०० या वेळात घेण्यात येईल. शिक्षक पात्रता पेपर-२ त्याच दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबर रोजीच दुपारी २.३० ते ५.०० या वेळात घेण्यात येईल. काही प्रशासकीय अडचणी उद्भवल्यास जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने म्हटले आहे.
शिक्षक पात्रता पेपर-१ देऊन टेट परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार प्राथमिकस्तर म्हणजेच इयत्ता १ ली ते ५ वीच्या वर्गावर अध्यापन करण्यासाठी नियुक्तीस पात्र ठरतील. तर शिक्षक पात्रता पेपर-२ देऊन टेट परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार उच्च प्राथमिकस्तर म्हणजेच इयत्ता ६ वी ते ८ वीच्या वर्गावर अध्यापन करण्यासाठी शिक्षण सेवक किंवा शिक्षक म्हणून नियुक्तीस पात्र ठरतील.
दोन्ही स्तरासाठी एकच अर्ज, एकच परीक्षा केंद्र
टेट परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता, अपंगत्व, आरक्षण इत्यादी बाबतची अचूक माहिती मूळ कागदपत्रातील नोंदीनुसार भरावी. ऑनलाइन अर्ज भरताना अपलोड करण्यासाठी शैक्षणिक अर्हता व आरक्षणासंबंधीची प्रमाणपत्रे, स्वतःचे रंगीत छायाचित्र, स्वाक्षरी, स्वघोषणापत्र आणि ओळखपत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती सोबत ठेवाव्यात. जे उमेदवार प्राथमिकस्तर (पेपर-१) आणि उच्च प्राथमिकस्तर (पेपर-२) देऊ इच्छितात, त्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना दोन्ही स्तर निवडल्यास त्यांना स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच त्यांना एकाच ऑनलाइन अर्जावर हे दोन्ही स्तर निवडता येतील. अशा उमेदवारांना दोन्ही पेपरच्या परीक्षेसाठी एकच परीक्षा केंद्र दिले जाईल, असेही परीक्षा परिषदेने म्हटले आहे.
लक्षात ठेवा महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधीः १५/९/२०२५ ते ३/१०/२०२५
- प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्याचा कालावधीः १०/११/२०२५ ते २३/११/२०२५
- शिक्षक पात्रता पेपर-१ दिनांक व वेळः रविवार दिनांक २३/११/२०२५ वेळः १०.३० ते १.००
- शिक्षक पात्रता पेपर-२ दिनांक व वेळ- रविवार दिनांक २३/११/२०२५ वेळः २.३० ते ५.००
