प्राध्यापकाने सुट्टी घेतली म्हणून थेट सेवासमाप्ती, कुलगुरूंचा वादग्रस्त निर्णय; वैयक्तिक खुन्नस काढण्यासाठीच कारवाई केल्याचा आरोप


नवी दिल्लीः वैद्यकीय कारणांमुळे सुट्टी घेतली म्हणून महाराष्ट्रातील एका प्राध्यापकाची थेट सेवासमाप्ती करण्याचा वादग्रस्त निर्णय जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी घेतला आहे. कुलगुरूंच्या या निर्णयामुळे प्राध्यापकांमध्ये संतप्ताची भावना निर्माण झाली असून जेएनयू शिक्षक संघाने कुलगुरूंच्या या कारवाईचा निषेध करत त्या प्राध्यापकाच्या सेवासमाप्तीचा आदेश तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.

प्रा. डॉ. रोहन  व्यंकटेश हलपेटी चौधरी यांची नियुक्ती जेएनयूच्या स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या राजकीय अध्ययन केंद्रात मार्च २०२४ मध्ये करण्यात आली होती. १२ महिन्यांच्या परीवीक्षाधीन कालावधीवर (प्रोबेशन) ते रूजू झाले. प्रा. डॉ. चौधरी यांचा परीवीक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणतेही कारण न देता तो अचानक सहा महिन्यांनी वाढवण्यात आला. या काळात डॉ. रोहन चौधरी यांच्या लहान मुलाची प्रकृती बिघडल्याने त्यांनी नियमित सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त ५१ दिवस वैद्यकीय कारणांमुळे सुट्टी घेतली.

जेएनयूमध्ये रजेचा अर्ज करण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली वापरली जाते. परंतु या काळात डॉ. चौधरी यांना ई-ऑफिसवर लॉग-इन करून रजेचा अर्ज करणे जमले नाही. परंतु त्यांनी विभागप्रमुखांना या रजेबाबत माहिती दिली होती. तरीही जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी डॉ. चौधरी यांच्या सुट्टीची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. या समितीने प्रा. डॉ. चौधरी यांनी ५१ दिवासंची सुट्टी घेतली असून सुट्टीचे व सीसीएसच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला. परंतु प्रा. डॉ. चौधरी यांनी नेमके कोणत्या नियमांचे उल्लंघन केले, याचा स्पष्ट उल्लेख चौकशी समितीच्या अहवालात नाही.

चौकशी समितीचा हा अहवाल कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित यांनी २७ ऑगस्ट रोजी झालेल्या जेएनयूच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत ठेवला आणि प्रा. चौधरी यांची सेवासमाप्त करण्यात आल्याचा निर्णय कुलगुरू पंडित यांनी जाहीर केला. जेएनयू शिक्षक संघाने कुलगुरूंचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगत या निर्णयाला विरोध केला आहे.

प्रा. डॉ. चौधरी यांच्याबाबत घेण्यात आलेला निर्णय पूर्णतः तथ्यहीन, अन्यायकारक आणि बेकायदेशीर आहे. डॉ. चौधरी यांच्या सेवासमाप्तीची घोषणा करताना कार्यकारी परिषदेच्या सर्व सदस्यांचे माईक बंद करण्यात आले होते. कोणालाही बोलू देण्यात आले नाही. अशाच पद्धतीने कार्यकारी परिषदेत अन्य अजेंड्यावरही चर्चा करण्यात आली, असे जेएनयू शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरजीत मजुमदार यांनी म्हटले आहे.

कारवाईमागे वैयक्तिक खुन्नस

प्रा. डॉ. चौधरी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासारखे कोणतेही प्रकरण अस्तित्वातच नव्हते. प्रा. डॉ. चौधरी यांच्या सेवासमाप्तीसारखी गंभीर कारवाई वैयक्तिक बदल घेण्यासाठीच करण्यात आली आहे, असा आरोपही मजुमदार यांनी केला आहे. प्रा. डॉ. चौधरी यांना न्याय मिळेपर्यंत आणि त्यांच्या सेवासमाप्तीचे आदेश मागे घेईपर्यंत लढा सुरूच राहील, असेही जेएनयू शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मजुमदार आणि सचिव प्रा. डॉ. मीनाक्षी सुंद्रीयाल यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!