
नवी दिल्ली: राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २१० ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातील ९ महिला सरपंचांसह १५ सरपंचांचा समावेश असून केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाकडून या सर्व सरपंचांचा विशेष सन्मान होणार आहे.
सन्मानित होणाऱ्या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सुधारणा घडवल्या आहेत. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचे शंभर टक्के प्रभावी कार्यान्वयन करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत.
महाराष्ट्रातील १५ सरपंच असे
- प्रमोद नरहरी लोंढे, लोंढेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.
- जयश्री धनंजय इंगोले, खासळा नाका, ता. कामठी, जि. नागपूर.
- संदीप पांडुरंग ढेरंगे, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे.
- डॉ. अनुप्रिता सचिन भांडे, म्हातोडी, ता. अकोला, जि. अकोला.
- नयना अशोक भुसारे,भावसे, ता. शहापूर, जि. ठाणे.
- सुनिता दत्तात्रय मिटकरी, ढोरखेडा, ता. मालेगाव, जि. वाशिम.
- अपर्णा नितीन राऊत, कोंढाळा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली.
- संजीवनी वैजनाथ पाटील, खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर.
- चंद्रकुमार काशीराम बहेकार, भेजपार, ता. सालेकसा, जि. गोंदिया.
- रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवार, ता. लाखनी, जि. भंडारा).
- सूरज संतोष चव्हाण, चिंचाळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
- पार्वती शेषराव हरकल, कुंभारी, ता. जिंतूर, जि. परभणी.
- प्रमोद किसन जगदाळे, बिदल, ता. मान, जि. सातारा.
- शशिकांत माधवराव मांगले, कसबेगव्हाण, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती.
- प्रभावती राजकुमार बिराजदार, बामणी, ता. उदगीर, जि. लातूर.
आज (१४ ऑगस्ट) या विशेष अतिथींचा औपचारिक सत्कार होणार असून, यावेळी केंद्रीय पंचायतराज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, केंद्रीय राज्य मंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ‘आत्मनिर्भर पंचायत, विकसित भारताची ओळख’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘सभा सार’ अॅप लाँच होणार असून ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाचा १६ वा अंक प्रकाशित केला जाणार आहे.

No comments
Namaste