जालन्याचे काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल अखेर भाजपच्या गळाला, ‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणेच्या जनकाच्याच हातात कमळ!


मुंबईः जालना विधानसभा मतदारसंघाचे तब्बल तीन टर्म आमदार राहिलेले काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामुळे जालना जिल्ह्यात भाजपला बळ मिळण्याची शक्यता असून त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

कैलास गोरंट्याल यांनी आज मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार रावसाहेब दानवे, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. गोरंट्याल यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने काँग्रेसच्या माजी मंत्री व माजी आमदारांना गळाला लावण्याचे डावपेच आखण्यास सुरूवात केली होती. त्यात आता कैलास गोरंट्याल यांच्या रुपाने आणखी एका माजी आमदाराची भर पडली आहे.

गेल्या काही दिवसांत भाजपने अनेक माजी आमदारांना गळाला लावले आहे. त्यात शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या माजी आमदारांचेही पक्षप्रवेश भाजपने घडवून आणले आहेत. नजीकच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदारांमध्ये सातारा जिल्ह्यातील पाटणचे सत्यजित पाटणकर, भोरमधील संग्राम थोपटे, पुरंदरमधील संजय जगताप यांचा समावेश आहे. या तिन्ही मतदारसंघात सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत.

कैलास गोरंट्याल यांनी जालना विधानसभा मतदारसंघाचे तीनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी त्यांचा ३१ हजार ६५१ मतांनी पराभव केला होता. तेव्हापासूनच कैलास गोरंट्याल हे काँग्रेसवर नाराज होते आणि ते कायम पक्षनेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेत होते. मागच्या निवडणुकीच्या वेळी विद्यमान आमदार असतनाही तिकिट देण्यास काँग्रेसने उशीर केला. त्याचा परिणाम निवडणुकीची तयारी आणि प्रचारावर झाला. त्यामुळेच आपला पराभव झाला, असे खापर गोरंट्याल यांनी पक्षनेतृत्वावर फोडले होते.

आलटून पालटून दोघेच आमदार

जालना विधानसभा मतदारसंघाचा गेल्या तीन दशकांच्या इतिहास पाहिल्यास या मतदारसंघाने आलटूनपालटून कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर या दोघांनाच आमदारकीची संधी दिली आहे. गेल्या तीन दशकात झालेल्या विधानसभा निवडणुकांत अर्जुन खोतकर हे चारवेळा तर कैलास गोरंट्याल हे तीनवेळा आमदार झाले आहेत. या दोघांव्यतिरिक्त जालना विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी अन्य कोणत्याही उमेदवाराला संधी दिलेली नाही. काँग्रेसच्या तिकिटावर तीनवेळा आमदार राहिलेले गोरंट्याल आता भाजपवाशी झाल्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

शिंदेसेना, खोतकरांची चिंता वाढली

कैलास गोरंट्याल यांच्या रुपाने तगडा नेता मिळाल्यामुळे जालन्यात भाजपचे बळ वाढणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेची चिंता वाढण्याची शक्यता आहे. २०२९ च्या निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. हे स्वबळ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मित्रपक्षांचे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातच ताकद वाढवण्याचे प्रयत्न भाजपकडून पद्धतशीरपणे केले जात आहेत. त्यासाठी मित्रपक्षांबरोबरच विरोधी पक्षातील तगडे नेते गळाला लावले जात आहेत. गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामुळे जालन्यातील शिंदेसेनेत खळबळ उडाली आहे.

सर्वात आधी गोरंट्यालच म्हणाले होते ‘पन्नास खोके, एकदम ओके’!

ग्रामपंचायतपासून ते विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये कायम शायरीत भाषण ठोकणारे नेते अशी कैलास गोरंट्याल यांची ओळख आहे. तीन-साडेतीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे हे ४० आमदार घेऊन गुवाहटीला गेले होते. त्यानंतर शिंदेसेना आणि भाजपवर टिका करताना विरोधी पक्षांनी सर्वाधिक वापरलेली घोषणा म्हणजे ‘पन्नास खोके, एकदम ओके’.

या सर्वाधिक वापरल्या गेलेल्या आणि कार्यकर्त्यांच्या तोंडी रूळलेल्या घोषणेचे जनक कैलास गोरंट्याल हेच आहेत. त्यांनीच पहिल्यांदा ही घोषणा दिली आणि ती महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. आता तेच कैलास गोरंट्याल भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे जालन्यातील शिंदेसेनेत अस्वस्थता पसरली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!