Video: समाज कल्याण उपायुक्त सोनकवडेंनी कामगार महिलेला घरगड्यासारखे राबवून करवून घेतला मसाज, पायही चेपून घेतले; आता तोंड बंद करण्याचा प्रयत्न!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगर विभागाच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तपदावरून जिल्हा जातपडताळणी समितीच्या उपायुक्तपदी बदली झालेल्या जयश्री सोनकवडे यांचे एकेक गंभीर स्वरुपाचे कारनामे आता उघडकीस येऊ लागले आहेत. पद आणि अधिकाराचा दुरूपयोग करत त्यांनी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कामगार महिलेला स्वतःच्या घरीच कामाला ठेवून घरगड्यासारखे राबवून घेतले. स्वतःबरोबरच दररोज आईचीही मसाज करवून घेतल्याचे व्हिडीओ न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत. विशेष म्हणजे त्या कामगार महिलेने याबाबतची तक्रार आयुक्तांकडे केल्यानंतर सोनकवडेंनी त्या महिलेवर दबाव टाकून तिचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

जयश्री सोनकवडे या २०२२ ते मार्च २०२५ या काळात छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तपदी कार्यरत होत्या. या काळात त्यांनी केलेल्या अनियमिततेबाबतच्या अनेक तक्रारी समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव आणि समाज कल्याण आयुक्तांना प्राप्त झाल्यानंतर सोनकवडे यांची प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तपदावरून उचलबांगडी करून छत्रपती संभाजीनगर जिल्हा जातपडताळणी समितीच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आणि त्यांनी केलेल्या अनियमिततेची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली.

हेही वाचाः रूजू अहवालात जयश्री सोनकवडेंकडून ‘सामाजिक न्याय’च्या प्रधान सचिवांसह समाज कल्याण आयुक्तांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, परंतु अद्याप कारवाई नाही!

सोनकवडे यांची विभागीय चौकशी करण्यासाठी ही समिती नुकतीच छत्रपती संभाजीनगरात येऊन गेली. या चौकशी समितीसमोर समाज कल्याण विभागाचे शासकीय वसतिगृह यूनिट क्रमांक ४ मध्ये सफाई कामगार म्हणून कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या महिला कामगाराने जयश्री सोनकवडे यांनी केलेल्या छळाची लेखी कैफियत मांडली.

‘ मी समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह यूनिट क्रमांक ४ मध्ये २०२३ पासून सफाई कामगार म्हणून काम करते. गृहप्रमुख वैशाली काळसरे यांच्या सांगण्यावरून मी उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या घरी कामाला गेले. काळसरे यांनी तेथे सोनाली बागुल यांनाही पाठवले. सोनकवडे आमच्याकडून सतत काम करून घेत. दहा मिनिटे सुद्धा आराम करून देत नसत. त्या दररोज स्वतःबरोबरच त्यांच्या आईची माझ्याकडून मसाज करून घ्यायच्या. कधी फ्रीज, कधी फरशी तर कधी झाडांची पाने पुसायला सांगत. सततच्या कामामुळे माझ्या उजव्या हाताला मोठी गाठ झाली आहे. या गाठीमुळे मला त्रास होत आहे’, असे त्या कामगार महिलेने चौकशी समितीसमोर दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

‘उपायुक्त सोनकवडे या एवढे काम करून घेतल्यानंतर त्या अपमानास्प वागणूक देत. घरात पाणीसुद्धा पिऊ देत नसत. आम्ही बसलो तर घाण होईल म्हणत बसूही देत नसत. त्या आमच्यावर दया करत नव्हत्या. उलट नाटक करता, बावळट बायका असे म्हणत त्या हिणवत होत्या. घरचे काम केले नाहीतर त्या कामावरून काढून टाकण्याची धमकी देत. त्यामुळे आम्ही काम करत होतो. यापूर्वी त्यांनी तीन महिलांना कामावरून काढून टाकले आहे’, असेही त्या कामगार महिलेने तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तपदावरून बदली झाल्यानंतरही आठ दिवस सोनकवडे यांनी त्या कामगार महिलेला स्वतःच्या घरी घरगड्यासारखे राबवून घेतल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

हेही वाचाः देशातील सर्वात मोठ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालय घोटाळ्याचा सीबीआयकडून पर्दाफाश; एनएमसी, यूजीसीचे माजी अध्यक्ष, स्वयंघोषित धर्मगुरू चालवत होते रॅकेट!

जयश्री सोनकवडे यांच्याविरोधात प्रशासकीय अनियमिततेच्या अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा जातपडताळणी समितीच्या अपायुक्तपदी बदली करण्यात आली आणि समाज कल्याण आयुक्तांमार्फत त्यांची विभागीय चौकशी चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीत जयश्री सोनकवडे यांचे अनेक कारनामे समोर आले. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कौशल्या नावाच्या महिला कर्मचाऱ्यानेही चौकशी समितीसमोर आपली कैफियत मांडली. सोनकवडे यांनी आपणाला दररोज घरचीच कामे लावली. स्वतःबरोबरच आईची दररोज मसाज करून घेतली. घरची भांडीकुंडी, फरशांची सफाई करून घेतली, असे तिने लेखी तक्रारीत म्हटले आहे. पहा व्हिडीओः

त्या कामगार महिलेने विभागीय चौकशी समितीसमोर आपल्या कारनाम्याची भंडाफोड केल्याची कानगुण जयश्री सोनकवडे यांना लागली. त्यानंतर सोनकवडे यांनी त्या कामगार महिलेशी फोनवरून संपर्क साधला आणि माझी काहीही तक्रार नाही असे पत्र तू मला लिहून दे असा दबाव टाकला. दोघींमध्ये झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप न्यूजटाऊनकडे उपलब्ध आहे. त्या दोघींमधील संवाद असाः

जयश्री सोनकवडेः कौशल्या…
महिला कामगारः हां मॅडम…
जयश्री सोनकवडेः बागलनी माझ्याविरोधात काही पत्र लिहून घेतलंय का तुझ्याकडून?
महिला कामगारः  कधी मॅडम?
जयश्री सोनकवडेः कारण काय झालंय माझी जी बदली झालीय ना..
महिला कामगारः हां…
जयश्री सोनकवडेः तर त्याच्यामध्ये मी आता कोर्टात गेलेली आहे, बरोबर आहे?
महिला कामगारः हां…
जयश्री सोनकवडेः  त्याच्यामध्ये चौकशी समिती नेमली यांनी माझ्या खोट्या तक्रारी केल्या होत्या सगळ्यांनी…
महिला कामगारः हां
जयश्री सोनकवडेः तर त्याच्यामध्ये एक मुद्दा असा लिहिलाय की कौशल्या यांना घरी खासगी कामं करायला लावत होते, असे तू लेखी दिलंय म्हणून लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये…
महिला कामगारः हो का?
जयश्री सोनकवडेः हां… मग तुझ्याकडून काही कोऱ्या पेपरवर सही घेतली होती का?
महिला कामगारः  ते मला काही… मी तर नाही केलं…
जयश्री सोनकवडेः आं? कारण ते त्याच्यामध्ये मुद्दा टाकलाय… तुझं नाव टाकलंय कौशल्या म्हणून….
महिला कामगारः हो का?
जयश्री सोनकवडेः  हां
महिला कामगारः बरं, विचारते मी मॅडमला…
जयश्री सोनकवडेः नाही असं काही लिहून दिलंय का?, नाही विचारू नको तू थांब जरा…तू असं काही दिलंय का तिला?
महिला कामगारः मला काही हे नाही, पण विचारते ना मॅडमला… लगेच फोन करून सांगते तुम्हाला…
जयश्री सोनकवडेः अगं विचारू नको बाई… कोर्टात केस आहे… तू विचारू नको, बोलू पण नको…
महिला कामगारः बरं…
जयश्री सोनकवडेः तर तू जर दिलं नसेल ना, तर तुला मला लिहून द्यावं लागेल की बाबा मी असं असं कुठलंही हे दिलं नाही म्हणून… तुझा काही संबंध नाही. तुम्ही बीव्हीजीची लोक आहेत. यांच भांडण ह्यांच्याशी आहे तर यांच्याशीच करायला पाहिजे ना ह्यांनी?
महिला कामगारः हां…
जयश्री सोनकवडेः हां मग तुला कशाला मध्ये घेतात गरीब लोकांना… लाज नाही वाटत का त्या बागलला?  अशा घाणेरड्या गोष्टी करायला?… तुमच्या गरीब लोकांचे नाव कशाला घेते ती मध्ये?  माझ्याशी भांड म्हणावं ना डायरेक्ट…
महिला कामगारः काय माहित…चालन नंतर फोन करू का मॅडम तुम्हाला?
जयश्री सोनकवडेः हां… नंतर कर… तिला बोलू नको काही तू सध्या… मी तुला लक्षात आणून दिलं असं आहे म्हणून…काही फरक पडत नाही मला…
महिला कामगारः बरं…
जयश्री सोनकवडेः तू लेखी अर्ज दिलाय, तुझ्या सहीचा अर्ज आहे असं तिथं लिहिलेलं आहे…
महिला कामगारः बरं बरं…
जयश्री सोनकवडेः कारण ते कोर्टातून आलंय ना माझ्याकडं सगळं…
महिला कामगारः हो का?
जयश्री सोनकवडेः हां… ते प्रशांतला मी बोलते…
महिला कामगारः बरं चालन…

या ऑडिओ संवादातही जयश्री सोनकवडे यांची त्या महिला कामगारावरील तिच्या आवाजातून दहशत स्पष्टपणे जाणवते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!