पोलिस कोठडीत असताना धमकावून खंडणी मागण्यासाठी डॉ. मझहर खानला स्वतःचा फोन देणे भोवले, खुलताबादचे एपीआय दिनकर गोरे निलंबित!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान खुलताबाद पोलिस ठाण्याच्या कोठडीत असताना त्याला कोहिनूर महाविद्यालयाच्या प्राचार्यांना धमकावून खंडणीची मागणी करण्यासाठी स्वतःच मोबाइल फोन देणे खुलताबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या चांगलेच अंगलट आले असून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गोरेंना निलंबित केले आहे.

 खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. ए. पाठ्यक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षेचे सर्वच्या सर्व पेपर दुसऱ्यांकडून लिहून घेतल्याप्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान, त्याची पत्नी व संस्थेची सचिव आस्मा खान यांच्यासह सहा जणांविरुद्ध यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात ६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचाः डॉ. मझहर खानने खुलताबाद पोलिस ठाण्याच्या कोठडीतून फोन करून खंडणी मागितलेल्या चार मोबाईल नंबरपैकी एक नंबर एपीआय दिनकर गोरेंचा!

गुन्हा दाखल झाल्यानंतर खुलताबाद पोलिसांनी डॉ. मझहर खानला १७ जून रोजी अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. खुलताबाद पोलिस ठाण्याच्या कोठडीत असताना डॉ. मझहर खानने कोहिनूर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शेख कमरूनिसा बेगम इक्रमोद्दीन यांना १८ व १९ जून रोजी चार वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून कॉल केले आणि त्यांना धमकावत खंडणीची मागणी केली होती.

हेही वाचाः खुलताबाद पोलिसांच्या कोठडीत असूनही डॉ. मझहर खानने फोनवरून धमकी देत कोहिनूर महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे केली खंडणीची मागणी

डॉ. मझहर खानने या दोन दिवशी प्रभारी प्राचार्यांना धमकावण्यासाठी वापरलेल्या चार मोबाइल नंबरपैकी ८८८८८३७५९४ हा मोबाइल नंबर खुलताबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांचा होता. या मोबाइल नंबरवरून १८ जून रोजी डॉ. मझहर खानने प्रभारी प्राचार्यांना फोन करून धमकावत खंडणीची मागणी केली होती. याबाबतची तक्रार प्रभारी प्राचार्या डॉ. कमरुनिसा बेगम यांच्यासह कोहिनूर महाविद्यालयातील ५४ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे १९ जून रोजी केली होती.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयातील ‘चारसौ बीसी’ प्रकरणात डॉ. मझहर खान आणि आस्मा खानसह सहा जणांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा

या तक्रारीची दखल घेत अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी चौकशी केली. या चौकशीत सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांनी पोलिस कोठडीत असताना डॉ. मझहर खानला फोन करण्यासाठी स्वतःचा मोबाईल वापरण्यास दिला. त्या मोबाइल फोनवरून डॉ. मझहर खानने प्रभारी प्राचार्यांना धमवकाल्याचे स्पष्ट झाले. पोलिस कोठडीतील आरोपीला अशा प्रकारे मोबाइल फोन वापरण्यास प्रतिबंध असताना सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांनी कर्तव्यात गंभीर कसूर केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!