
मुंबई: खासगी एजन्सीमार्फत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा मृत्यू किंवा अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदाराने वेळेवर नुकसान भरपाई द्यावी याबाबत महत्वाचे निर्णय आणि धोरणात्मक बदल लवकरच लागू केले जातील. यापुढे अशा कामगारांना ३ ते ६ महिन्यांऐवजी १५ दिवसांत मदत अथवा नुकसान भरपाई देण्याचे आदेश महापालिकांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषदेत दिली.
एखाद्या कंत्राटी कामगारांचा मृत्यू किंवा अपघात झाला असेल आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरने वेळेवर नुकसानभरपाई दिली नाही, तर त्या कॉन्ट्रक्टरने महानगरपालिकेकडे जमा केलेल्या रक्कमेत कपात करून ती रक्कम महापालिकेने थेट कामगाराच्या कुटुंबाच्या खात्यात जमा करावी. यासाठी नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात येतील. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अन्याय होऊ नये, यासाठी यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय व धोरणात्मक बदल लवकरच लागू केले जातील, असे सामंत म्हणाले.
सफाई कामगारांसंदर्भात महापालिकेच्या धोरणासंदर्भात आ. श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी सामंत यांनी उत्तर दिले. या चर्चेदरम्यान आ. सचिन अहिर, ॲड. निरंजन डावखरे, राजेश राठोड यांनीही उपप्रश्न विचारले.
मुंबईत मलनि:स्सारण वाहिन्या आणि गटारांची सफाई करताना ज्या सफाई कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला, तो महानगरपालिकेचा कर्मचारी नव्हता. खासगी एजन्सीतर्फे काम करताना त्याच्या दुर्देवी मृत्यूनंतर खासगी एजन्सीकडून त्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्यात आली असल्याचे सामंत यांनी सांगितले.
राज्य सरकारने नुकतेच मदतीचे निकष बदलले असून आता अपंगत्वासाठी १० लाख रुपये, कायम अपंगत्वासाठी २० लाख रुपये आणि मृत्यू झाल्यास ३० लाख रुपये अशी भरपाई देण्यात येते. मागील तीन वर्षांत अशा ३५ मृत्यूंच्या प्रकरणांमध्ये या स्वरूपातील मदत देण्यात आली आहे. यापुढे अशी मदत तीन ते सहा महिन्यांऐवजी १५ दिवसांत देण्याचे आदेश महापालिकांना देण्यात आले आहेत, असे सामंत म्हणाले.
