
नवी दिल्लीः यंदा आयआयटी-कानपूरने घेतलेल्या जेईई ऍडव्हान्स (JEE-Advanced 2025 ) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत मुलांमधून रजित गुप्ता तर मुलींमधून देवदत्त माझी पहिले आले आहेत. जेईई-ऍडव्हान्सच्या निकालात पहिल्या १० जणांच्या यादीत मुंबईतील पार्थ वर्तक आणि साहिल देव या दोन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
यावर्षी जेईई ऍडव्हान्स परीक्षा १८ मे २०२५ रोजी दोन सत्रात घेण्यात आली होती. २५ मे रोजी जेईई-ऍडव्हान्सची प्रोव्हिजन आन्सर की जारी करण्यात आली होती. उमेदवारांना आक्षेप नोंदवण्यासाठी २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. आज या परीक्षेच्या निकालाबरोबरच पेपर १ आणि पेपर २ ची फायनल आन्सर कीसुद्धा जारी करण्यात आली आहे. जे विद्यार्थी जेईई-ऍडव्हान्समध्ये पात्र ठरले आहेत, ते आयआयटी प्रवेशासाठी ३ जूनपासून सुरू होणाऱ्या समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
आयआयटी दिल्ली झोनमधून परीक्षेला बसलेला रजित गुप्ता हा ३६० पैकी ३३२ गुण मिळवून कॉमन रँक लिस्टमध्ये (सीआरएल) पहिला आला आहे. याच झोनमधून परीक्षेला बसलेला सक्षम जिंदाल हा ३३२ गुण मिळवून दुसरा आला आहे. परंतु तो सीआरएलमध्ये १६ व्या क्रमांकावर आहे.
आयआयटी मुंबई झोनमधून परीक्षा दिलेला माजीद हुसेनने ३३० गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेच्या पहिल्या १० जणांच्या यादीत मुंबईतील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.. आयआयटी मुंबई झोनमधून परीक्षा दिलेला पार्थ वर्तक याने ३६० पैकी ३२७ गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला आहे तर साहिल देव याने ३६० पैकी ३२१ गुण मिळवून सातवा क्रमांक पटकावला आहे. आयआयटी खरगपूर झोनमधून परीक्षा दिलेली देवदत्त माझी ही ३६० पैकी ३१२ गुण मिळवून मुलींमधून पहिली आली आहे. सीआरएलमध्ये ती १६ व्या क्रमांकावर आहे.
टॉप १० परीक्षार्थी असे
- सीआरएल १: रजित गुप्ता, ३३२ गुण
- सीआरएल २: सक्षम जिंदाल, ३३२ गुण
- सीआरएल ३: माजीद हुसेन, ३३० गुण
- सीआरएल ४: पार्थ वर्तक, ३२७ गुण
- सीआरएल ५: उज्ज्वल केसरी, ३२४ गुण
- सीआरएल ६: अक्षयकुमार चौरासिया, ३२१ गुण
- सीआरएल ७: साहिल देव, ३२१ गुण
- सीआरएल ८: देवेश भैय्या, ३१९ गुण
- सीआरएल ९: अर्णव सिंग, ३१९ गुण
- सीआरएल १०: वदलामुदी लोकेश, ३१७ गुण
५४ हजार ३७८ विद्यार्थीच पात्र
आयआयटी कानपूरने घेतलेल्या या परीक्षेसाठी देशभरातून १ लाख ८७ हजार २२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८० हजार ४२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात १ लाख ३९ हजार ८५ मुले तर ४१ हजार ३३७ मुलींचा समावेश होता. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५४ हजार ३७८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यात ९ हजार ४०४ मुलींचा समावेश आहे.
