कोहिनूर महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रावर कायमस्वरुपी बंदी, न्यूजटाऊनच्या दणक्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा मोठा निर्णय!


छत्रपती संभाजीनगर: कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव आस्मा खान यांनी स्वतःच्याच महाविद्यालयातील स्वतःच्या परीक्षा केंद्रावर स्वतःच परीक्षार्थी बनून बेकायदेशीरपणे दुसऱ्यांकडून एम.ए. हिंदी पाठ्यक्रमाच्या प्रथम सत्राचे सर्वच्या सर्व पेपर सोडवून घेतल्याप्रकरणी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने खुलताबादच्या कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रावर कायमस्वरूपी म्हणजेच आजन्म बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. न्यूजटाऊनने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.

खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र आहे. या अभ्यास केंद्रावर या महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव आस्मा खान यांनी एम. ए. हिंदी पाठ्यक्रमाला प्रवेश घेतला आणि डिसेंबर २०२४ च्या सत्राच्या जानेवारीमध्ये झालेल्या प्रथम सत्राच्या परीक्षेचे सर्वच्या सर्व पेपर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक फेरोज शेख आणि कार्यालयीन कर्मचारी बाळू भोपळे यांच्याकडून बेकायदेशीरपणे सोडवून घेतले होते. हे प्रकरण उजेडात आणून न्यूजटाऊनने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे मुक्त विद्यापीठाच्या प्रशासनाला कारवाईच्या दिशेने पावले उचलणे भाग पडले.

हेही वाचाः कोहिनूरच्या अध्यक्षांची ‘चारसौ बीसी’: मुक्त विद्यापीठाच्या स्वतःच्याच परीक्षा केंद्रावर प्राध्यापकांवर दबाव टाकून सोडवून घेतले स्वतःचे एमए हिंदीचे पेपर!

परीक्षेतील गंभीर स्वरुपाच्या गैरव्यवहाराचे हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीने आपला अहवाल देऊन तब्बल २३ दिवस उलटले आहेत. हे प्रकरण चव्हाट्यावर येऊन चार महिने उलटले तरी या प्रकरणातील दोषींवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याचे वृत्त न्यूजटाऊनने शनिवारी (३१ मे) रोजी प्रसिद्ध केल्यानंतर विद्यापीठाचे प्रशासन हलले आणि त्यांनी तातडीने पावले उचलत कोहिनूर महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर कायमस्वरुपी म्हणजे आजन्म बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचाः कोहिनूर  महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर चारसौ बीसी: मुक्त विद्यापीठाने नेमली प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती, सोमवारपासून झाडाझडती

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील ‘चारसौ बीसी’ प्रकरणी मुक्त विद्यापीठाचे चौकशीचे गुऱ्हाळ संपेना, चार महिने उलटले तरी कारवाईचा पत्ता नाही!

कोहिनूर महाविद्यालयातील अभ्यास केंद्रावर झालेला गैरप्रकार आणि या अभ्यास केंद्राचे मनसुबे पाहता या महाविद्यालयातील अभ्यास केंद्रावर कायमस्वरुपी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे कोणत्याही सबबीवर कोहिनूर महाविद्यालयाला मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र दिले जाणार नाही, अशी माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव आणि छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय केंद्राचे प्रभारी संचालक दिलीप भरड यांनी न्यूजटाऊनशी बोलताना दिली.

हेही वाचाः परीक्षेतील चारसौ बीसीः मुक्त विद्यापीठाच्या प्रमाद समितीसमोर डॉ. मझहर खान, आस्मा खानसह कोहिनूर महाविद्यालयाच्या दोन कर्मचाऱ्यांची उद्या झाडाझडती

दोषींविरुद्ध नोंदवणार गुन्हे

कोहिनूर महाविद्यालयाच्या प्रकरणात कारवाई करण्यात कोणतीही चालढकल झाली नाही. चौकशीचा अहवालप्राप्त झाल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागला. कोहिनूर महाविद्यालयातील अभ्यास केंद्र कायमस्वरुपी बंद करण्याबरोबरच या प्रकरणात दोषी असलेल्यांविरुद्ध आज किंवा उद्या पोलिसांत गुन्हे नोंदवण्यात येतील अशी माहितीही भरड यांनी दिली. त्यामुळे कोहिनूर महाविद्यालयाचे संस्थाचालक आणखी एका कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात अडकणार आहेतच परंतु त्यांच्यासोबत कोण-कोणाचा नंबर लागतो, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!