छत्रपती संभाजीनगरः शहराच्या किराडपुरा भागात काल रात्री तरूणांच्या दोन गटात झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर तुफान राड्यात झाले. संतप्त जमावाने दगडफेक, जाळपोळ आणि तुंबळ हाणामारी केली. यात पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी वाहनेही जाळण्यात आली. या घटनेमुळे या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आता किराडपुऱ्यातील तणाव निवळला असून परिस्थितीही नियंत्रणात आहे. किराडपुरा भागात काल रात्री नेमके काय घडले? याबाबतचा घटनाक्रम पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना गुप्ता यांनी हा घटनाक्रम सांगितला.
पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितलेला घटनाक्रम असा- “काल रात्री ११ वाजेच्या सुमारास किराडपुरा भागातील राम मंदिराजवळ तरूणांच्या दोन गटात किरकोळ भांडण झाले. त्यानंतर एका गटातील तरूण निघून गेले. मात्र काही वेळानंतर या ठिकाणी गर्दी जमा झाली. पोलिसांनी या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या एक तासानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमा व्हायला सुरूवात झाली. त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केली.”
“दगडफेक सुरू झाल्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजकंटकांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिसांना त्यांना रोडवर थांबवणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर माझ्यासह काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आम्ही पोलिस बळाचा वापर करून तो जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.”
“एक ते दीड तास हा प्रकार सुरू होता. जमावाने मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगड फेकले. त्यांनी पोलिसांची आणि काही खासगी वाहने जाळली. पहाटे तीन-साडेतीन वाजेच्या सुमारास आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली.”
“या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करण्यात येईल”, असे गुप्ता म्हणाले.
हेही वाचाः संभाजीनगरातील तणाव निवळला, परिस्थिती नियंत्रणातः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
घटनास्थळी पोलिस उशिरा पोहोचले, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यावरही पोलिस आयुक्त गुप्ता यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “अशावेळी नेमकी परिस्थिती काय आहे ते समजून घेणे गरजेचे असते. काल समाजकंटकांनी या भागातील लाईट फोडल्यामुळे अंधार झाला होता. त्यामुळे परिस्थिती समजून घेऊनच आम्ही कारवाई केली”, असे गुप्ता यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनीही घेतली बैठकः संभाजीनगरमध्ये काल रात्री झालेल्या राड्याबाबत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीला आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे आणि पोलिस आयुक्त निखिल गुप्ता या बैठकीला हजर होते. शहरात शांतता आणि सौहार्द्र कायम राखण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.