शरीरसुखास नकार देणाऱ्या महिला डॉक्टरला सहकारी डॉक्टरनेच ठरवले मनोरूग्ण, वेश्या व्यवसाय करण्यासाठीही दबाव!


अंबाजोगाईः व्यसनमुक्ती केंद्रात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरने शरीरसुखास नकार दिल्यामुळे तिच्या सहकारी डॉक्टरने तिला चक्क मनोरूग्ण ठरवले आणि तिच्यावर वेश्या व्यवसाय करण्यासाठीही दबाव आणल्याचा धक्कादायक बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिकेसह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला डॉक्टरने अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री फिर्याद दिली. या फिर्यादीत पीडित महिला डॉक्टरने तिची धक्कादायक आपबिती कथन केली आहे. पीडित महिला डॉक्टरने फिर्यादीत म्हटले आहे की, अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात माझी निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यादिवशीपासून मी तेथे हजर राहून कामाला सुरूवात केली. माझ्यासोबत ड्युटीला डॉ. राजकुमार गोपाळ गवळे, ओम डोलारे, व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील हजर होते.

मी सलग तीन महिने काम केले परंतु माझी पगार केली नाही. त्यानंतर तीन महिन्यांनी माझा एकदाच पगार करण्यात आला. डॉ. राजकुमार सोपान गवळे ( रा. पाटोदा जळकोट, जि. लातूर) हेही वैद्यकीय अधिकारी म्हणून तेथे नोकरीस आहेत. ते सतत माझ्या ड्युटीमध्ये हस्तक्षेप करून माझ्या वैद्यकीय तपासणीत चुका काढून मला मानसिक त्रास देत.

या व्यसनमुक्ती केंद्रात कार्यरत असलेला ओम डोलारे हा व्यक्ती १२ वी पास आहे. तो एक्स्पायरी झालेल्या गोळ्या तेथील रूग्णांना देतो. १५ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता मी या गोळ्यांबाबत विचारण्यासाठी गेले असता तो मला मारण्यासाठी अंगावर धावून आला. त्याबाबत मी डॉ. राजकुमार गवळे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्री १ वाजता मी व्यसनमुक्ती केंद्रात ड्युटीवर असताना माझ्यासोबत ड्युटीवर असलेले डॉ. राजकुमार गवळे यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्या गोष्टीला विरोध करून मी त्यांना खडसावले.

त्यानंतर डॉ. राजकुमार गवळे याने १ जानेवारी २०२३ रोजी पुरूष व महिला कर्मचाऱ्यांना सांगून जबरदस्तीने माझा मोबाईल हिसकावून घेतला. मी मानसिक रूग्ण आहे म्हणून मला ऍडमिट केले. मला झोपेचे लोराझेपाम इंजेक्शन देऊन झोपी घातले. माझ्या घरच्यांना फोन करून बोलावून घेतले आणि माझ्यावर मानसिक परिणाम झालेला असल्याचे सांगितले.

समुपदेशक प्रदीप पवार यांना सांगून माझ्या घरच्यांच्या केस पेपरवर सह्या घेण्यास सांगितले. घरच्यांनी त्यांना सह्या करण्यास नकार दिला. त्यानंतर माझ्यावर चुकीचे औषधोपचार करून माझी मानसिक व शारीरिक स्थिती खराब केली.

व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील यांनी मला याबाबत कुठे बोलललीस तर मी तुला येथेच डांबून ठेवीन, मारहाण करीन असे धमकावून मला वेश्या व्यवसाय करण्यास सांगितले. मला डिस्चार्ज देताना मारण्याची धमकीही दिली, असे पीडित महिला डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली बाबुराव पाटील, संचालक डॉ. राजकुमार गवळे आणि ओम डोलारे या तिघांविरुद्ध गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!