नागपूर: महिलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी औरंगाबादमध्ये पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु केले जाईल, अशी घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत केली.
आमदार सतीश चव्हाण यांनी महिला कृषी महाविद्यालय सुरु करण्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना सत्तार बोलत होते. राज्यात ४८ शासकीय आणि अनेक खासगी कृषी महाविद्यालये आहेत. या प्रत्येक महाविद्यालयामध्ये महिला प्रवेशासाठी ३० टक्के जागा राखीव करण्यात आल्या आहेत, असे सत्तार म्हणाले.
महिलांच्या कृषी क्षेत्रातील शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये खास बाब म्हणून पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु केले जाईल. यासोबतच औरंगाबादमध्ये उप कृषी विद्यापीठ सुरु करण्याबाबत समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही अब्दुल सत्तार यांनी सभागृहात स्पष्ट केले.