मुंबईः खासदार गजानन किर्तीकर यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. रविंद्र नाट्य मंदिरात आज झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदेंच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचा झेंडा हाती घेतला. गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून गजानन किर्तीकरंचे तळ्यात-मळ्यात सुरू होते.
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गजानन किर्तीकरही एकनाथ शिंदेंच्या गटात गेल्यामुळे शिंदेंसोबत असलेल्या खासदारांची संख्या आता १३ झाली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राज्यसभेचे तीन खासदार धरून एकूण ९ खासदार राहिले आहेत.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले गजानन किर्तीकर हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर किर्तीकर यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलतानाही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून चूक केली, असे जाहीरपणे बोलून दाखवले होते.
गेल्या काही दिवसांपासून गजानन किर्तीकर यांची चलबिचल सुरू होती. ते व्दिधा मनःस्थितीत होते. ठाकरे गट की शिंदे गट असे त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू होते. ते एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची चर्चाही सुरू होती. त्यातच त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची ङेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी रविंद्र नाट्य मंदिरातील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला.
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या लोकाधिकार महासंघाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच झाला. शिवसेना भवनातील लोकाधिकार महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष असलेले खा. गजानन किर्तीकर हेच या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने तेव्हापासूनच ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
गजानन किर्तीकर हे १९९० ते २००९ या काळात मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघाचे चारवेळा आमदार राहिले आहेत. २०१४ पासून ते सलग दोनवेळा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेनेचे दिग्गज नेते अशी खा. गजानन किर्तीकर यांची ओळख होती. आता तेच किर्तीकर उद्धव ठाकरे यांच्या गटातून एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत.