
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आजपासून (२९ एप्रिल) प्रारंभ झाला. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी बीड शहरातील तीन परीक्षा केंद्राना ’सरप्राईज व्हिजिट’ दिली. या भेटीत त्यांना ३६ कॉपीबहाद्दर आढळून आले. या कॉपीबहाद्दरांचा ’संपूर्ण परफॉर्मन्स रद्द’ (डब्ल्यूपीसी) करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले आहेत. त्यामुळे कॉपीबहाद्दरांची पाचावर धारण बसली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या आहेत. चार जिल्हयातील ८० केंद्रावर सुमारे ३० हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यापूर्वी पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ८ एप्रिलपासून सुरळीतपणे सुरु झाल्या. आता दुसऱ्या टप्प्यात आजपासून एम.ए, एम.कॉम, एम.एस्सी, बी.एड, बी.पीएड. आदी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे (एनईपी-२०२३) या परीक्षा घेण्यात येत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे ५ हजार ५४८ विद्यार्थी, मानव्यविद्या शाखेचे ७ हजार २०१, आंतरविद्या शाखेचे २ हजार ११२ तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे सर्वाधिक १३ हजार ५८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या सर्व अभ्यासक्रमांचे एकुण २९ हजार ९६९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्हयात मिळून ३२ परीक्षा केंद्रे आहेत. त्यासाठी ३२ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
दरम्यान, पदव्युत्तर परीक्षा सुरु झाल्यावर कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी पहिल्याच दिवशी आज बीड शहरातील बलभीम महाविद्यालय, केएसके महाविद्यालय व आदित्य व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय अशा तीन परीक्षा केंद्रांना सकाळच्या सत्रात भेट दिली. या तीनही ठिकाणी अनुक्रमे १५, १५ व ६ असे ३६ विद्यार्थी कॉप्या करतांना आढळून आले. या विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही कुलगुरुंनी दिले.
कुलगुरूंच्या या सरप्राईज व्हिजिटच्यावेळी भरारी पथकातील डॉ. सतीश दांडगे व डॉ. भास्कर साठे हेही उपस्थित होते. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बलभीम महाविद्यालयात ४२८, केएसके महाविद्यालयात १७८ तर आदित्य व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात ३३७ असे एकूण १ हजार ३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
परीक्षा केंद्रात अनेक त्रुटी, सुविधांचाही अभाव
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रावर विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे व्यवस्था करण्यात आल्याचे कुलगुरूंना आढळले नाही. या तीनही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सर्वात वरच्या मजल्यावर बसवण्यात आले. ‘स्ट्राँग रुम’ मध्ये सीसीटीव्ही, झेरॉक्स मशीन नसल्याचेही दिसून आले. या असुविधांबाबत कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी संबंधित केंद्र प्रमुखाला विचारणा केली. या भेटीच्या वेळेपर्यंत केएसके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर तसेच सहकेंद्रप्रमुख हे महाविद्यालयात आले नव्हते.
बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष उंदरे, केंद्रप्रमुख व सहकेंद्रप्रमुख असे उपस्थित होते तर आदित्य व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयांचे संपूर्ण केंद्रच विस्कळित होते. या सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे बैठक व्यवस्था करण्याचे आदेशही कुलगुरु यांनी दिले. या संदर्भात कुलगुरूंनी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.भारती गवळी यांना विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्याची सूचनाही केली.