बोगस पदवी घोटाळा प्रकरणी प्रा. डॉ. शंकर अंभोरेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठी लिहिता-वाचताही न येणाऱ्या शेख मोहम्मद हाफीज याला बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे पूर्णवेळ सहशिक्षकपदावर नियुक्ती दिल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मान्यता रद्द केलेले कोहिनूर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शंकर अंभोरे यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
शेख मोहम्मद हाफीज उर रहेमान याने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून बी.ए., एम. ए. ची बनावट व खोटी पदवी तयार केली. या बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे त्याने खुलताबाद येथील कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात अंशत: अनुदानित पूर्णवेळ सहशिक्षकपदाची नोकरी मिळवली होती.
शेख मोहम्मद हाफीज उर रहेमानची बोगसगिरी उघडकीस आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी अहवाल दिल्यानंतर शेख मोहम्मद हाफीजला १८ एप्रिल रोजी सकाळी पोलिसांनी अटक केली होती.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मझहर खान आणि प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे या दोघांनीच या सगळ्या प्रकरणात मदत केल्याचे शेख मोहम्मद हाफीज उर रहेमानने सांगितल्यानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांनी प्रा. डॉ. शंकर अंभोरेंना पेठेनगरातील राहत्या घरातून रात्री अटक केली होती.
शनिवारी पोलिसांनी प्रा. डॉ. शंकर अंभोरेंना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने प्रा. डॉ. अंभोरेंना २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज पाच दिवसांची पोलिस संपल्यामुळे पोलिसांनी आज प्रा. डॉ. अंभोरेंना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
अचानक बदलला तपास अधिकारी
दरम्यान, या बोगस पदवी घोटाळ्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे करत होते. सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर हे सहायक तपास अधिकारी म्हणून काम पहात होते. तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात असल्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असतानाच काल (२२ एप्रिल) अचानक या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त शिंदे यांच्याकडून काढून घेऊन तो गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!