
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): उन्हाचा पारा वाढल्याचे कारण देत विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा नियोजित तारखेऐवजी २२ एप्रिलपासून घेण्याच्या निर्णयाला आंदोलनाचा चटका देत विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यूटर्न घेतला असून आता विधी अभ्यासक्रमाच्यापरीक्षा ६ मेपासूनच घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी तसे परिपत्रक आज जारी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्च/एप्रिल सत्राच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ मेपासून घेण्याचे जाहीर केले होते. परंतु उन्हाचा पारा वाढल्याचे कारण देत परिपत्रक काढून २२ एप्रिलपासून घेण्याचे जाहीर केले होते. परीक्षांच्या वेळापत्रकात अचानक बदल केल्यामुळे आणि परीक्षा अवघा चार दिवस येऊन ठेपल्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा दुप्पट ताण पडणार असल्यामुळे या परीक्षा निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे ६ मेपासूनच घेण्यात याव्यात, अशी मागणी एसएफआय आणि विद्यार्थ्यांनी केली.
एसएफआय या विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात काही विद्यार्थी काल (१६ एप्रिल) परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक, कुलगुरू आणि प्रकुलगुरूंना निवेदन देण्यासाठी गेले असता सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना अडवले होते. मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप लावल्यामुळे विद्यार्थ्यांना दोन तास ताटळकत गेटवरच उभा रहावे लागले होते. शेवटी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले.
विद्यार्थ्यांनी काल आंदोलनाचा चटका देत निवेदन दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत आज यूटर्न घेतला आणि पदवी, पदविका व पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा ६ मेपासून तर बी.एड., एम्.एड. एम.पीएड., व इतर सर्व शिक्षणशास्त्र तसेच शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा २९ एप्रिलपासून घेण्यात येतील, असे जाहीर केले आहे.
या तारखांप्रमाणे परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी आज जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
