सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम’, ६० जागांसाठी ७ एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया!


पुणेः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव असलेल्या पुणे विद्यापीठात ‘फाऊंडेशन ऑफ टेम्पल मॅनेजमेंट’ म्हणजेच मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून या अभ्यासक्रमाच्या ६० जागांसाठी ७ एप्रिलपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून १ जुलैपासून अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

७ एप्रिल ते ३१ मेदरम्यान या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. ५ जूनला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत. १ जुलैपासून हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीला किमान ४५ टक्के गुण तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के गुण अनिवार्य आहेत. या अभ्यासक्रमासाठी कोणतीही शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

नाशिकचे धार्मिक महत्व, नाशिक परिसरात असलेली मंदिरे आणि नाशिकमध्ये होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले. या अभ्यासक्रमात तीन महिने प्रशिक्षण आणि तीन महिने ऑन जॉब ट्रेनिंग दिले जाणार आहे.

नाशिक परिसरातील मंदिरांचे धार्मिक तसेच पौराणिक महत्व, या मंदिरांना भेट देणारे भाविक, धार्मिक पर्यटन आणि २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांचा वाढणारा ओघ लक्षात घेता हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. परंतु सावित्रीबाई फुलेंच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठातच अशा प्रकारचा धार्मिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयावरून वाद होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!