
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आणखी एक ‘चारसौ बीसी’ न्यूजटाऊनच्या हाती आली आहे. या संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांनी पुण्यातील प्रतिष्ठित डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचीच फसवणूक करून एम.फिल. च्या बोगस पदव्या मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बेंगळुरूच्या राजीव गांधी हेल्थ सायन्सेस विद्यापीठाची (आरजीयूएचएस) बीएचएमएसची बनावट गुणपत्रिका व पदवी तयार केल्याप्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. आस्मा खान यांच्याविरुद्ध बेंगळुरूच्या टिळकनगर पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल झालेला असून २५ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू पोलिसांनी डॉ. मझहर खान यांना अटकही केली होती. तर उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील वीर बहादूरसिंग पूर्वांचल विद्यापीठाची एलएलबीची बनावट पदवी तयार केल्याप्रकरणी डॉ. मझहर खान याच्याविरुद्धही गुन्हा दाखल आहे. त्यातच आता डॉ. आस्मा खान आणि मकसूद खान यांच्या बोगस एम. फिल. पदवीचे प्रकरण उजेडात आले आहे.
कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान यांच्याकडे इंग्रजी विषयातील एम.फिल.ची याच शिक्षण संस्थेचे सहसचिव मकसूद खान यांच्याकडे हिंदी विषयातील एम.फिल. पदवी आहे. पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून एम.फिल. च्या या पदव्या प्राप्त केल्याचा या दोघांचाही दावा आहे.
डॉ. आस्मा खान यांनी २०१९ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात एम.फिल.ला प्रवेश घेतला आणि २०२० मध्ये एम.फिल. पूर्ण केली असे भासवत एमफिल प्रथम वर्षाची गुणपत्रिका (बैठक क्रमांकः एच/एमफिल/१८०८४, अनुक्रमांकः ४५८१९३७) आणि २०२० मध्ये द्वितीय वर्षाची गुणपत्रिका (बैठक क्रमांकः एच/एमफिल/१८०८४, अनुक्रमांकः ५१४७१८५) तयार करवून घेतली आणि डॉ. आस्मा खान यांनी ऑगस्ट २०२० मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची एम.फिल. (इंग्रजी) पदवी तयार करून घेतली.
कोहिनूर शिक्षण संस्थेचे सहसचिव पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान याने २०१६ मध्ये याच विद्यापीठात हिंदी विषयातील एम.फिल. या प्रवेश घेतल्याचे भासवून प्रथम वर्षाची गुणपत्रिका (बैठक क्रमांकः एच/एमफिल/१५११७, अनुक्रमांक २४८५९७३) आणि २०१७ मध्ये द्वितीय वर्षाची गुणपत्रिका (बैठक क्रमांकः १५११७, अनुक्रमांक ३०२१७८५) तयार करून घेतल्या आणि ऑगस्ट २०१७ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची एम.फिल. (हिंदी) पदवी तयार करून घेतली.
डॉ. आस्मा खान आणि मकसूद खान यांच्या दफ्तरी आजही डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या एम.फिल. पदवीच्या प्रत्येकी दोन गुणपत्रिका आणि प्रत्येकी एक पदवी आहे. त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या या बोगस पदव्या कोणाकडून तयार करून घेतल्या की डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील कर्मचारीच बोगस पदव्या विक्रीचे रॅकेट चालवतात? हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.
कसा झाला पर्दाफाश?
डॉ. आस्मा खान आणि मकसूद खान यांच्या एम. फिल. च्या पदव्यांबाबत संशय आल्यामुळे रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी पहिल्यांदा मकसूद खान यांच्या हिंदी विषयातील एम. फिल.च्या पदवीबाबत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रकांशी ६ मार्च २०२५ रोजी पत्रव्यवहार केला. या पत्राला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलसचिवांनी १० मार्च रोजी तातडीने उत्तर देत धक्कादायक खुलासा केला.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून मास्टर ऑफ फिलॉसॉफी (हिंदी) हा अभ्यासक्रमच चालवला जात नाही. त्यामुळे पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान यांना एम.फिल. (हिंदी) च्या गुणपत्रिका आणि पदवी आमच्याकडून जारी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही ईमेलद्वारे पाठवलेली डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे बनावट आणि खोटी आहेत. संबंधित उमेदवार आमचा विद्यार्थी नाही. संबंधित उमेदवाराने डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव आणि लोगोचा दुष्ट हेतूने वापर करून गुन्हा केला आहे, असे कुलसचिवांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून मकसूद खान यांच्या एम. फिल.च्या पदवीबाबत हा धक्कादायक खुलासा केल्यानंतर नागराज गायकवाड यांनी डॉ. आस्मा इद्रिस खान यांच्या इंग्रजी विषयातील एम. फिल. पदवीबाबत १२ मार्च रोजी विद्यापीठाशी पत्रव्यवहार केला. त्यावरही विद्यापीठाने १७ मार्च रोजी मकसूद खान याच्या एम.फिल.च्या पदवीप्रमाणेच डॉ. आस्मा खान यांचीही एम.फिल.ची पदवी बनावट आणि खोटी असल्याचे धक्कादायक उत्तर दिले आणि या दोघांच्याही बोगस पदव्यांचा पर्दाफाश झाला.

मग डीपीयूने फिर्याद का दिली नाही?
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयू) ही पुण्यातील प्रतिष्ठित आणि नावलौकिक असलेली उच्च शिक्षण संस्था आहे. देशभरातून विद्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी विश्वासाने येतात. आस्मा खान आणि मकसूद खान यांनी आपल्या विद्यापीठाचे नाव आणि लोगो वापरून बोगस एम.फिल. च्या पदव्या हस्तगत केल्याच्या तक्रारीची विद्यापीठानेच चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले आहे. त्यामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हताच पणाला लागली आहे.
असे असताना आपल्या संस्थेचे नाव आणि लोगोचा वापर करून बनावट पदव्या विकल्या/बनवल्या जात आहेत, हे उघडकीस आल्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रशासनाने आस्मा खान आणि मकसूद खान या दोघांच्याही विरोधात पोलिसांत फिर्याद देऊन गुन्हे नोंदवणे अपेक्षित होते. परंतु विद्यापीठाच्या कुलसचिवांनी तक्रारदार नागराज गायकवाड यांनाच या दोन्ही उमेदवारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे डीपीयूने स्वतःहून पोलिसात फिर्याद का दिली नाही? पिंप्री पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाकडे हे पत्रच फक्त फॉर्वर्ड का केले? असे गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

