समाज कल्याण विभागातील नोकर भरती परीक्षेच्या उत्तरतालिकेवर २४ मार्चपासून नोंदवा आक्षेप, मात्र प्रतिप्रश्न भरावे लागेल १०० रुपये शुल्क!


मुंबईः सामाजिक न्याय विभागाअंतर्गत समाज कल्याण आयुक्त कार्यालयातर्फे ४ मार्च ते १९ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या विविध पदांच्या भरतीसाठीच्या परीक्षेची उत्तरतालिका २४ मार्च ते २८ मार्चदरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार असून या कालावधीत परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवता येणार आहेत. मात्र त्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी १०० रुपये शुल्क मोजून आक्षेप नोंदवता येणार आहे.

समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/ अधीक्षक (महिला), गृहपाल/ अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक,  उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील पदे सरळसेवेने भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती.

या सर्व पदांसाठी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ४ ते १९ मार्च या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तरतालिका (Response Sheet) २४ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपासून ते २८ मार्च रोजी सायं. ६:०० वाजेपर्यंत उमेदवारांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना/आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने २४ मार्च ते २८ मार्च या कालावधीत नोंदवण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ त्याबाबतची कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल. सूचना/आक्षेप नोंदवण्यासाठी प्रतिप्रश्न १०० रुपये शुल्क प्रतिआक्षेप ऑनलाईन पध्दतीने भरणा करणे आवश्यक असेल.

२४ मार्च ते २८ मार्च या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वतःच्या लॉगीन आयडीवरुन नोंदवलेले सूचना/आक्षेप विचारात घेतले जातील व त्यानंतरचे सूचना/आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत.

सूचना/आक्षेप संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ई-मेलद्वारे स्वीकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!