‘टक्कल व्हायरस’चे रहस्य उलगडलेः रेशन दुकानावरील गहू खाल्ल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात केसगळतीची समस्या, संशोधनातील धक्कादायक निष्कर्ष


बुलढाणाः बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील काही गावांमधील नागरिकांची केसगळती होऊन काही दिवसांतच टक्कल पडल्याच्या समस्येचे रहस्य अखेर उलगडले असून रेशन दुकानावरील ‘विषारी तत्व’ असलेला गहू रोजच्या आहारात वापरल्यामुळेच केसगळतीची समस्या निर्माण झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष संशोधनातून काढण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांमधील नागरिकांच्या डोक्यावरील केस अचानक गळून त्यांना टक्कल पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या समस्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी दिल्ली आणि चेन्नई येथून तज्ज्ञांची पथके बुलढाणा जिल्ह्यात येऊन गेली होती. या पथकांनी नमुने गोळा केले होते.

पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनीही अनेक महिने बुलढाणा जिल्ह्यातील या टक्कल व्हायरसवर संशोधन केले असून विषारी तत्व असलेला गहू खाल्ल्यामुळे केसगळतीची समस्या निर्माण झाल्याचा निष्कर्ष त्यांनी त्यांच्या संशोधनातून काढला आहे. रेशन दुकानावर वाटण्यात येणारा गहू टक्कल व्हायरसच्या या समस्येला कारणीभूत असल्याचे डॉ. बावस्कर यांच्या संशोधनातून समोर आले आहे.

शेगाव येथील गव्हामध्ये इतर ठिकाणच्या गव्हाच्या तुलनेत सेलेनियमचे प्रमाण ६०० पटीने अधिक असल्याचे आढळून आले आहे. तर झिंकचे प्रमाण अत्यल्प आढळून आले आहे. सेलेनियमचे अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे अलोपेसिया (टक्कल) आजाराची अनेक प्रकरणे शेगाव तालुक्यात आढळून आली आहेत. शेगाव तालुक्यातील गावांमध्ये अलोपेसियाची लक्षणे दिसल्यानंतर तीन ते चारच दिवसात संपूर्ण डोक्यावर टक्कल पडल्याच्या घटना घडल्या आहेत, असे डॉ. बावस्कर म्हणाले.

या संशोधनासाठी डॉ. बावस्कर यांनी शेगाव तालुक्यातील टक्कल व्हायरसने बाधित १८ गावातील गव्हाचे नमुने ठाणे येथील व्हर्नी ऍनालिटिकल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. या गावांतील प्रतिकिलो गव्हामध्ये सेलेनियमचे प्रमाण तब्बल १४.५२ मिलीग्राम आढळून आले आहे. प्रतिकिलो गव्हामध्ये सेलेनियमचे सामान्य प्रमाण १.९ मिलीग्राम असायला हवे. परंतु हे प्रमाण त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे, असे डॉ. बावस्कर म्हणाले. बाधित गावांतील गहू पंजाबमधून आल्याचेही बावस्कर म्हणाले.

या बाधित गावातील नागरिकांच्या रक्त, मूत्र आणि केसांच्या नमुन्यात सेलेनियमचे प्रमाण अनुक्रमे ३५ पट, ६० पट आणि १५० पट अधिक आढळून आले आहे. बाधित लोकांमध्ये झिंकचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात आढळून आले आहे. अधिक प्रमाणात सेलेनियमचे सेवन केल्यामुळेच केसगळतीची समस्या उद्भवल्याचे दिसून येते, असे डॉ. बावस्कर म्हणाले. डॉ. बावस्कर यांनी आपल्या संशोधनाचा अहवाल अद्याप सरकारकडे सादर केलेला नाही, असे लोकसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

शेगाव तालुक्यातील १८ गावांमध्ये डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान ३०० जणांची केसगळती होऊन टक्कल पडले होते. त्यात बहुसंख्य महाविद्यालयीन व तरूण मुलींचा समावेश होता. या समस्येमुळे मुला-मुलींनी शाळा-महाविद्यालयात जाणे बंद केले होते तर अनेक मुलींची लग्नेही मोडली होती. सामाजिक संबंधांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आपण हे संशोधन केले, असे डॉ. बावस्कर म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!