
मुंबईः परभणी येथील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या परभणी बंददरम्यान झालेली जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला तरूण कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही सोमनाथच्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त केला आहे. आम्ही न्यायासाठी लढू, अशी गर्जना प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. तर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उद्या १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला आहे. हे अत्यंत वेदनादायक, भयानक आणि असह्य करणारे आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. याहून असहनीय काय असेल!’, असे प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झालेला असल्यामुळे पोस्टमार्टेम (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रूग्णालयातच केले जावे आणि फॉरेन्सिक व पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांकडून पोस्टमार्टेमचे चित्रिकरण केले जावे, अशी विनंती आमचे वकील न्यायालयाला करतील. आम्ही न्यायासाठी लढू, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचाः परभणी हिंसाचारः सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाचे छत्रपती संभाजीनगरात होणार ऑन कॅमेरा शवविच्छेदन
उद्या महाराष्ट्र बंदची हाक
एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी न्यायासाठी लढू अशी गर्जना केली असतानाच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उद्या १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्यामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाण्याची शक्यता आहे.
