नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये ५ कोटींची रोकड हस्तगत, बड्या राजकीय नेत्यावर संशय;  निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई


नाशिकः महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. अशातच नाशिकमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला पाच कोटी रुपयांहून अधिक रकमेचे घबाड सापडल्याची माहिती समोर येत आहे. ही रक्कम एका बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचा संशय असून भरारी पथकाने एका राजकीय नेत्याची गाडीही जप्त केली आहे.

नाशिकमधील रॅडिसन ब्लू या नामांकित हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या नावे दोन खोल्या बुक आहेत. या हॉटेलमधून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून या रोकड रकमेच्या बॅगा सापडल्या आहेत. भरारी पथकाने पाच कोटींपैकी  दोन कोटींची रोकड जप्त केली आहे. उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज सकाळपासून नाशिकमधील हॉटेलवर छापेमारी केली. या छापेमारीत या नामांकित हॉटेलमध्ये पाच कोटींहून जास्तीची रक्कम सापडली आहे. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

या रोकड रकमेबरोबरच एका राजकीय पक्षाच्या नेत्यालाही भरारी पथकाने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. इतकी मोठी रक्कम कुठून आणली? ती का आणली? हे पैसे कुणी दिले? कशा दिले? यासारख्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून शोध घेण्यात येत आहे. महायुतीच्या एका उमेदवारासाठी ही रक्कम आणण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.

नाशिकमध्ये आतापर्यंत रोकड, दारू आणि इतर बाबी मिळून तब्बल ७३ कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. आजची कारवाई ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!