वॉशिंग्टनः जागतिक महासत्ता अमेरिकेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आल्या आहेत. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाले आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून आले आहेत. ट्रम्प यांनी बहुमताचा २७० हा आकडा पार करत हा विजय मिळवला.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना २७७ इलेक्ट्रोरल मते मिळाली आहेत. तर डेमॉक्रॅट पक्षाच्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना २२६ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.
ओहियोमध्ये डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार शेरॉड ब्राऊन यांचा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बर्नी मोरेनो यांच्याकडून पराभव झाला. त्यापूर्वी वेस्ट व्हर्जिनियामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जिम जस्टिस यांनी सहज विजय मिळवला. या दोन जागांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हानिया आणि मिशिगन येथे डेमॉक्रॅटिक पक्षाकडून रिपब्लिकन पक्षाला कडवी झुंज मिळाली.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले आहे. त्यांनी अमेरिकेतील सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. हा इतिहासातील सर्वात मोठा राजकीय क्षण असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आपण आपला देश कधीच नव्हता इतका उत्तम बनवणार आहोत. हे यश आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारा आहे. आपल्याला सर्व समस्या सोडवायच्या आहेत. आपण सगळे मिळून अमेरिकेला पुन्हा महान बनवू शकतो. हे करणं माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मी तुमचा अपेक्षाभंग करणार नाही. अमेरिकेचे भविष्य आणखी विशाल, आणखी चांगले, आणखी श्रीमंत आणि सामर्थ्यशाली असेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या भवितव्यासाठी मी प्रत्येक दिवशी लढत राहीन. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे, तोपर्यंत मी लढत राहीन. समर्थ, सुरक्षित आणि वैभवशाली अमेरिका घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा अमेरिकेचा सुवर्णकाळ असणार आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.