मुंबईः समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (कॅस) लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
१ जानेवारी २०१६पासून या योजनेचा लाभ देण्याचे ठरले. या बैठकीत यासाठी येणाऱ्या ४५ कोटी ९८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनेचा एक भाग म्हणून ही योजना इतर महाविद्यालयांना लागू आहे. त्यामुळे तिचा लाभ समाजकार्य महाविद्यालयातील अध्यापकांना लागू करण्याची मागणी होती.
कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ असे या विद्यापीठाचे नामकरण असेल. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आला.
खंड क्षमापित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना
खंड क्षमापन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. खंड क्षमापन झालेल्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा “गट-अ” संवर्गातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अस्थायी सेवेत रुजू झालेले तसेच २ फेब्रुवारी २००९ रोजीच्या अधिसूचनेव्दारे समावेशन झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या निवड मंडळामार्फत नियुक्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या अधिकाऱ्यांना विधि व न्याय विभागाच्या २८ फेब्रुवारी २०१७ च्या शासन परिपत्रकातील समान प्रकरणी समान न्याय या तत्वास अनुसरुन शासन निर्णय, ८ नोव्हेंबर २०२३ नुसार खंड क्षमापन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल.