रतन टाटा यांचे निधन, भारताच्या सामाजिक विकासात योगदान देणारा उद्योगपती काळाच्या पडद्या आड


मुंबई:  टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, ख्यातनाम उद्योगती रतन टाटा यांचे आज निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनामुळे कायम संवेदनशीलपणा जपणारा आणि सढळ हस्ते मदत करणारा आणि संकटाच्या काळात देशाला कायम साथ देणारा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला आहे.

रतन टाटा यांना सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी अफवाही पसरल्या होत्या. त्यावर स्वतः रतन टाटा यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली होती. वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे टाटा यांनीच सांगितले होते.

आज सायंकाळी त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. कायम संवेदनशीलपणा जपणारा आणि सढळ हस्ते मदत करणारा उद्योगपती अशी रतन टाटा यांची ख्याती होती.

टाटा समूहाने कोणताही उद्योग सुरू करण्यापूर्वी आधी देशाचा विचार केला. देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी उद्योग उभारले. रतन टाटा यांनी टाटा समूहाची ही परंपरा कायम राखली.

भारताच्या संकटाच्या काळात ते कायम देशासोबत ठामपणे उभे राहिले. उच्च नैतिक मूल्य जपण्याचे काम रतन टाटा यांनी केले. त्यामुळेच देशातील अनेक उद्योगपतींबाबत लोक तिरस्काराने बोलत असताना टाटांच्या बाबतीतला आदर कायम राहिला.

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता.१९९१ ते २०१२ या कालावधीत रतन टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष होते. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होते. रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे.

परोपकार हाच स्थायीभाव

रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठी जगभर प्रसिद्ध होते. रतन टाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला २८ दशलक्ष डॉलर्स दान दिले होते. हॉर्वर्ड बिझनेस स्कूलला ५० दशलक्ष डॉलर्स दान केले होते. आयआयटी-मुंबईला संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांनी ९५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. यामुळे भारतातील गरिब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना मोठी मदत झाली. रतन टाटा हे दरवर्षी त्यांच्या कमाईतील मोठा वाटा धर्मादाय कार्यासाठी खर्च करत असत. रतन टाटांनी काळाची पावले ओळखून टीसीएस ही कंपनी स्थापन केली. टाटा समूहाच्या एकूण महसुलात या कंपनीचा मोठा वाटा आहे. व्यवसाय करताना रतन टाटा यांनी कायमच उच्च  कोटीच्या नैतिकतेची जपणूक केली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!