विधानसभा निवडणूक २०२४:  वंचित बहुजन आघाडीची ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, फडणवीसांच्या विरोधातही दिला उमेदवार!


मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर व्हायच्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावरून बोलणी सुरू आहे. महायुती-मविआ या दोन प्रमुख प्रतिस्पर्ध्यांच्या आधीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर करण्यात मात्र आघाडी घेतली आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विधानसभेच्या ११ जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने विनय भांगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे विद्यमान आमदार अतुल सावे यांच्या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून विकास दांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवार यादीसोबतच वंचितने उमेदवारांची जातही जाहीर केली आहे.

वंचितची पहिली यादी अशी

  • रावेरः शमिभा पाटील (तृतीयपंथी/लेवा पाटील)
  • सिंदखेड राजाः सविता मुंढे (वंजारी)
  •  वाशिमः मेघा किरण डोंगरे (बौद्ध)
  • धामणगाव रेल्वेः निलेश विश्वकर्मा (लोहार)
  • नागपूर दक्षिण-पश्चिमः विनय भांगे (बौद्ध)
  • साकोलीः डॉ. अविनाश नन्हे (धीवर)
  • नांदेड दक्षिणः फारूख अहमद (मुस्लिम)
  • लोहाः शिवा नारंगळे (लिंगायत)
  • औरंगाबाद पूर्वः विकास दांडगे (मराठा)
  • शेवगावः किसन चव्हाण (पारधी)
  • खानापूरः संग्राम माने (वडार)

वंचितने आज उमेदवार जाहीर केलेल्या ११ विधानसभा मतदारसंघांपैकी रावेरमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी, नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसचे मोहन हंबर्डे, सिंदखेड राजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे हे विद्यमान आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले होते. परंतु या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह वंचितच्या एकाही उमेदवाराला यश मिळालेले नाही. त्यामुळे आता प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच वंचितने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

 येत्या काही दिवसांत आणखी काही नावांची घोषणा केली जाईल. आम्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या संपर्कात आहोत आणि लवकरच आणखी काही पक्ष आमच्या आघाडीत येतील, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

मराठा आणि ओबीसीमध्ये मानवनिर्मित दंगली घडवण्यात अपयश आल्यानंतर मुख्यप्रवाहातील राजकीय पक्षांनी हिंदू-मुस्लिम विभाजनाची जुनी आणि तपासून पाहिलेली पद्धत अवलंबली आहे. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांच्या मौनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!