…तर लाडक्या बहिणींच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणारः आ. रवि राणा यांचे खळबळजनक वक्तव्य


अमरावतीः मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. लाडक्या बहिणींनी मला आशीर्वाद द्यावा. आमचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपये देऊ. परंतु आशीर्वाद न देणाऱ्या बहिणींकडून १५०० रुपये परत घेऊ, असे खळबळजनक वक्तव्य सत्ताधारी महायुतीतील आमदार रवि राणा यांनी केले आहे. आ. राणा यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीने सडकून टीका केली आहे.

सोमवारी अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांना आ. रवि राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते प्रमाणपत्र व साडीचोळीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आ. रवि राणा यांनी हे धमकीवजा खळबळजनक वक्तव्य केले.

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद देण्याची गरज आहे. मला तुमचे आशीर्वाद आणि सहकार्य हवे आहे. पण आशीर्वाद न देणाऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार आहे. नवनीत राणा यांच्यासारखा आशीर्वाद देऊ नका, असा टोलाही आ. रवि राणा यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांना मारला.

हा पैसा आ. राणांच्या बापाचा आहे काय?

आ. राणा यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीने टीका केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी बहिणींना फसवण्यासाठी ही योजना सरकारने आणली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारी पैशातून आहे. आ. रवि राणा जे बोलले ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मनातले बोलले आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

 आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील काय? हा सरकारचा पैसा आहे की ह्यांच्या बापाचा आहे? आ. रवि राणा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घरातून हा पैसा देणार आहेत काय? असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांची भाषा ही राज्यातील बहिणींचा अपमान करणारी आहे. त्यामुळे सरकारने बहिणींची माफी मागावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!