छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांनी दमदाटी करत धमकावल्यामुळे राजीनामा दिलेले विद्यापीठाचे आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. आनंद वाघ प्रकरणावरून प्राध्यापकांतील बेकी चव्हाट्यावर आली आहे. राजकीय लाभासाठी आरएसएस-भाजप प्रणित ‘विद्यापीठ विकास मंच’ची पताका खांद्यावर घेतलेल्या प्राध्यापकांनी गुरुवारी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची भेट घेऊन डॉ. वाघ यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आणि डॉ. सानप यांची तळी उचलून धरली तर डॉ. वाघ हे सचिव असलेल्या ‘बामुक्टा’ या प्राध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे या संघटनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. आनंद वाघ यांना ५ जुलै रोजी विद्यापीठाचे राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांनी प्र-कुलगुरूंच्या दालनात बोलावून दमबाजी करत धमकावल्यामुळे त्यांनी ९ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे सोपवला होता.
माझे हात मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत. अधिवेशनात मी तुमचा मुद्दा उपस्थित करून तुम्हाला नोकरीतून काढू शकतो, अशा शब्दांत राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांनी आपल्याला प्र-कुलगुरूंच्या दालनात दमबाजी करत धमकावल्याची तक्रार करत डॉ. आनंद वाघ यांनी प्रभारी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. आपण मराठा असल्यामुळेच डॉ. सानप यांनी आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोपही डॉ. वाघ यांनी केला होता. त्यांच्या या राजीनाम्यानंतर काही संघटनांनी कुलगुरूंची भेट घेत डॉ. सानप यांचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. या मागणीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने कुलपती तथा राज्यपाल कार्यालयाला पत्र लिहून या प्रकरणी काय कार्यवाही करावी? याबाबत मार्गदर्शन मागवले.
दरम्यान, डॉ. आनंद वाघ यांच्या राजीनामा प्रकरणावरून विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांतील बेकी चव्हाट्यावर आली आहे. एका पदाधिकाऱ्याने दमबाजी करत धमकावल्यामुळे विद्यापीठातील एका अधिकाऱ्याला राजीनामा द्यायची वेळ आली, या गंभीर घटनेवरही ‘बुद्धीजीवी’ प्राध्यापक त्यांच्यातील एकी दाखवू शकले नाहीत.
डॉ. सानप यांची भूमिका रास्त, वाघांची कृती गलिच्छ
राजकीय लाभ मिळवून खुर्च्या उबवण्यासाठी आरएसएस-भाजप प्रणित विद्यापीठ विकास मंचची पताका खांद्यावर घेतलेल्या प्राध्यापकांनी मंचचे निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे यांच्या नेतृत्वात गुरूवारी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची भेट घेऊन डॉ. आनंद वाघ यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. ‘एखाद्या विभागातील भ्रष्ट व्यवहार चव्हाट्यावर आणून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी रास्त भूमिका घेणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्यावर बिनबुडाचे आरोप करणे निंदनीय आहे. डॉ. आनंद वाघ यांची कृती विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण गढूळ करण्यास पूरक आहे. त्यांच्या या गलिच्छ कृतीमुळे ते उच्च शिक्षित असल्याबद्दल शंका निर्माण होते,’ असे नमूद करत विद्यापीठ विकास मंचमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांनी डॉ. वाघ यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे आणि डॉ. गजानन सानप यांची तळी उचलून धरत त्यांच्या कृतीचे एक प्रकारे समर्थनच केले आहे.
‘साजूक तुपा’तील भूमिकेत डॉ. फारूकी फिट कसे?
विशेष म्हणजे ‘भ्रष्ट व्यवहार चव्हाट्यावर आणून दोषीवर कारवाई झालीच पाहिजे’ अशी भूमिका घेणाऱ्या विद्यापीठ विकास मंचच्या या शिष्टमंडळात नापास झालेल्या अफगाणी विद्यार्थीनीला बेकायदेशीररित्या पदवी प्रदान केल्याच्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मझहर फारूकी यांचाही समावेश होता. त्यामुळे ‘एखादी व्यक्तीच असते की ती असे गलिच्छ प्रकार करून जाते, परंतु त्याचे अनिष्ठ आणि दूरगामी परिणाम त्या परिसंस्थेवर होत असतात,’ अशी ‘साजूक तुपातील’ भूमिका घेत डॉ. वाघ यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या विद्यापीठ विकास मंचला डॉ. मझहर फारूकी कसे चालतात?, आम्ही केला तो ‘राष्ट्राचार’ आणि दुसऱ्याने केला तर ‘भ्रष्टाचार’ अशी तर विद्यापीठ विकास मंचची भूमिका नाही ना? सा सवाल केला जात आहे.
‘बामुक्टा’च्या अस्तित्वाचे प्रयोजनच काय?
डॉ. गजानन सानप यांनी दमबाजी करून धमकावलेले डॉ. आनंद वाघ हे ‘बामुक्टा’ या प्राध्यापक संघटनेचे सचिव आहेत. आपल्याच संघटनेच्या सचिवाला एका पदाधिकाऱ्याने दमबाजी करून धमकावल्यामुळे त्याच्यावर राजीनामा देण्याची वेळ आलेली असतानाही बामुक्टाने मात्र या प्रकरणात अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. न्यूजटाऊनने बामुक्टाचे अध्यक्ष डॉ. बी.एन. डोळे यांच्याशी संपर्क साधून संघटनेची भूमिका विचारली असता आम्ही कुलगुरूंना भेटून या प्रकरणात त्यांची भूमिका काय आहे? अशी विचारणा करू, असे म्हणाले.
संघटना म्हणून तुम्ही अद्याप कोणतीही भूमिका का घेतली नाही, अन्य संघटना कुलगुरूंची भेट घेत असताना तुम्ही भेट का घेतली नाही? या प्रश्नावर आम्ही बैठक घेतली. आम्ही कुलगुरूंना भेटणारच होतो, पण मध्ये सुट्ट्या आल्या. आम्ही कुलगुरूंना भेटून डॉ. वाघ यांच्या आरोपातील सत्यता पडताळून बघण्याची मागणी करणार आहोत, असे डोळे म्हणाले. परंतु संघटना म्हणून आम्ही डॉ. वाघ यांच्या पाठीशी आहोत, असे स्पष्टपणे ते सांगू शकले नाहीत. आपल्याच सचिवांसोबत घडलेल्या प्रकाराबद्दल जर एखादी संघटना स्पष्ट भूमिका घेऊ शकत नसेल तर त्या संघटनेच्या अस्तित्वाचे प्रयोजनच काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
दरम्यान, डॉ. आनंद वाघ यांनी दिलेला राजीनामा विद्यापीठ प्रशासनाने फेटाळून लावला आहे. दुसरीकडे डॉ. गजानन सानप यांनी डॉ. वाघ यांच्यावर केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.बी. शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही त्रिसदस्यीय चौकशी समिती डॉ. आनंद वाघ यांनी केलेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून आपला अहवाल कुलगुरूंना सादर करणार आहे. त्यानंतरच डॉ. वाघ यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.