न्यूजटाऊन इम्पॅक्ट: ‘त्या’ भोंदू योगीबाबाची विद्यापीठातील दुकानदारी बंद, आता क्रीडा संचालक डॉ. जगताप, कोच शूरकांबळे कारवाईच्या फेऱ्यात!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागात अनधिकृतपणे योगाचे वर्ग घेणाऱ्या आणि योगवर्गासाठी आलेल्या विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत अश्लील भाषा वापरणाऱ्या भोंदू योगाबाबाची दुकानदारी बंद करण्यात आली असून विद्यापीठ प्रशासनाला अंधारात ठेवून या भोंदू बाबाला योगवर्ग घेण्याची परवानगी देणारे क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप आणि जलतरण प्रशिक्षण किरण शूरकांबळे रडारवर आले आहेत. या दोघांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. न्यूजटाऊनने या योगी बाबाच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश बुधवारी केला होता.

विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप आणि जलतरण प्रशिक्षक किरण शूरकांबळे यांनी विद्यापीठ प्रशासनाला अंधारात ठेवून संगनमताने बाबाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोंदू योगीबाबाला क्रीडा विभागात अनधिकृतपणे योगाचे वर्ग घेण्याची परवानगी दिली होती. हा भोंदू योगीबाबा दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा करतो. वैद्यकीय उपचारापेक्षाही आपली योगविद्या प्रबळ असल्याचा दावा करत हा बाबा विद्यापीठात योगवर्गाची दुकानदारी चालवत होता.

हेही वाचाः विद्यापीठ ‘योगी बाबा’च्या वेगळ्याच’ क्रीडा’; योगवर्गात विद्यार्थिनींशी गैरवर्तन, ‘मी काय तुमचा नवरा आहे का?’ म्हणत अश्लील भाषेत पाणउतारा!

योगवर्गासाठी आलेल्या विद्यार्थिनींशी या भोंदू योगीबाबाने गैरवर्तन केले. ‘तुमचे नखरे सहन करायला मी काय तुमचा नवरा आहे का?’ म्हणत विद्यार्थिनींशी अश्लील भाषा वापरली. योगीबाबाकडून दिल्या जाणाऱ्या या भलत्याच योगविद्येचा पर्दाफाश न्यूजटाऊनने बुधवारी केला आणि विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूजटाऊनच्या वृत्ताची दखल घेत प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप यांना फैलावर घेतले.

विद्यापीठ प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा रितसर परवानगी न घेता बाहेरच्या व्यक्तीला विद्यापीठ परिसरात योगवर्ग घेण्याची परवानगी कशी काय देण्यात आली?  उद्या काही गैरप्रकार झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?  अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्या भोंदू योगीबाबाच्या योगवर्गाची दुकानदारी तातडीने बंद करण्याचे निर्देश डॉ. सरवदे यांनी जगताप यांना दिले आणि गुरूवारपासून त्या भोंदू योगीबाबाची दुकानदारी बंद झाली.

आता विद्यापीठ प्रशासनाला अंधारात ठेवून क्रीडा संचालक प्रा. डॉ. संदीप जगताप आणि जलतरण प्रशिक्षक किरण शूरकांबळे या दोघांनी संगनमताने विद्यापीठाच्या मालमत्तेचा खासगी व्यक्तीला परस्पर वापर करण्याची परवानगी दिल्यामुळे या दोघांच्या विरोधात कारवाई हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडून या दोघांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

डॉ. जगताप, शूरकांबळेंना बडतर्फ करा

दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाला अंधारात ठेवून बाहेरच्या व्यक्तीला संगनमताने विद्यापीठ परिसरात योग वर्ग घेण्यास परवानगी देणारे क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप आणि जलतरण प्रशिक्षक किरण शूरकांबळे यांना बडतर्फ करा, अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांनी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे केली आहे.

विद्यापीठ ही आपल्या बापाची जहागीरी आहे, असे समजून डॉ. जगताप आणि शूरकांबळे यांनी क्रीडा विभागात हा सगळा उद्योग चालवला आहे. या सर्व प्रकारास जबाबदार धरून जगताप आणि शूरकांबळे यांच्या विरोधात बडतर्फीची कारवाई करा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडमारे यांनी निवेदनाद्वारे कुलसचिवांना दिला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!