माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी, लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपला पहिला धक्का


नांदेडः नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला का नाकारले, याबाबत पक्षात आत्मचिंतन करून कारणमींमासा केली जात असतानाच आज भाजपला नांदेडमध्ये पहिला धक्का बसला. माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा संयोजकपदाची राजीनामा दिला आहे. सूर्यकांता पाटील यांनी राजीनामापत्रात नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सूर्यकांता पाटील यांनी भाजपला जय श्रीराम केल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

२०१४ मध्ये सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांच्यावर हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या संयोजकपदाची जबाबदारी सोपवली होती. सूर्यकांता पाटील या हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासही इच्छूक होत्या. तशी इच्छा त्यांनी भाजपकडे बोलूनही दाखवली होती. परंतु पक्षाने त्यांना ती संधी दिली नाही.

भाजपकडून वेळोवेळी डावलेले जात असल्यामुळे सूर्यकांता पाटील या नाराज होत्या. भाजपकडून कोणतेही महत्वाचे स्थान मिळत नसल्यामुळे त्या अधूनमधून आपली खदखद बोलूनही दाखवत होत्या. त्यातच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना आणि डॉ. डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेवर संधी देण्यात आल्यामुळे त्यांची नाराजी आणखीच वाढली होती. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

काय म्हटलंय राजीनामापत्रात?

आपल्या सोबत गेल्या दहा वर्षांत खूप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमिटीपर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली आणि भारतीय जनता पक्षाची आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. आपल्या प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला, परंतु आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. कोणतीही कटुता मनात न ठेवता मी राजीनामा देत आहे, तो स्वीकारावा ही नम्र विनंती, असे सूर्यकांता पाटील यांनी दिलेल्या राजीनामापत्रात म्हटले आहे.

आता पुन्हा शरद पवारांकडे की अन्य पक्षात?

मध्यंतरी सूर्यकांता पाटील सक्रीय राजकारणातून संन्यास घेणार अशी चर्चा नांदेड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. परंतु त्या राजकारणात सक्रीय राहिल्या. परंतु भाजपकडून महत्वाचे स्थान देण्यात न आल्यामुळे त्या फारशा सक्रीय दिसल्या नाही. आता भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याकडे नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सूर्यकांता पाटील पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधतात की काँग्रेस पक्षात प्रवेश करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!