एडीनबर्गः हॅरी पॉटर या गाजलेल्या सिनेमात रुबियस हॅग्रीडची भूमिका करणारे अभिनेते रॉबी कोल्टरेन यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. कोल्टरेन यांची हॅरी पॉटरमधील हॅग्रीडची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. कोल्टरेन हे हॅरी पॉटरशिवाय ब्रिटीश टीव्ही मालिका क्रॅकरमधील भूमिकेसाठी ओळखले जायचे.
रॉबी कोल्टरेन यांच्या प्रवक्त्या बेलिंडा राईट यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. स्कॉटलंडमधील रुग्णालयात कोल्टरेन यांचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कोणत्या कारणामुळे कोल्टरेन यांचे निधन झाले, हे त्यांनी सांगितले नाही.
१९९० च्या दशकातील क्रॅकर या टीव्ही मालिकेतील डिटेक्टिव्हच्या भूमिकेमुळे रॉबी कोल्टरेन चर्चेत आले होते. त्यांना सलग तीन वर्षे ब्रिटीश अकादमी टेलिव्हिजनचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २००१ ते २०११ दरम्यान आलेल्या हॅरी पॉटर फिल्मच्या मालिकेत त्यांनी हॅरी पॉटरच्या मेंटॉरची भूमिका पार पाडली होती. रुबसे हॅग्रीड असे त्यांच्या पात्राचे नाव होते.
१९७९ मध्ये कोल्टरेन यांनी अभिनयाला सुरूवात केली होती. त्यांना बीबीसीच्या ए किकअप द एटीज या विनोदी टीव्ही मालिकेमुळे खरी ओळख मिळाली होती. कोल्टरेन यांनी जेम्स बॉण्ड थ्रिलर्स गोल्डन आय आणि द वर्ल्ड इज नॉट इनफ या चित्रपटातही खलनायकाची भूमिका केली होती. हॅरी पॉटरमधील हॅग्रीड या पात्राच्या माध्यमातून त्यांनी केवळ लहान मुलांच्याच नव्हे तर मोठ्यांच्याही चेहऱ्यावर हसू आणलं, असे बेलिंडा म्हणाल्या. कोल्टरेन यांच्या निधनामुळे हॉलीवूडच्या कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. हॅरी पॉटर चित्रपटातील रुबियस हॅग्रीडच्या चेहऱ्यावरील निरागसपणा आणि गोड स्वभावाचे पात्र लोकांच्या कायम स्मरणात राहील.